उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील यमुना एक्सप्रेस-वेवर मंगळवारी भीषण अपघात झाला. बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२७ किलोमीटर मैलस्तंभाजवळ झालेल्या या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर १३ मृत्यूंची पुष्टी करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्लोक कुमार यांनी सांगितले की, घटनास्थळी आढळलेले सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले होते. आतापर्यंत १३ मृत्यू निश्चित झाले आहेत. अपघातस्थळी सापडलेला मलबा आणि अवशेष मोर्चरीत ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी काही मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे. आतापर्यंत काही मृतांची ओळख पटली असून उर्वरितांची प्रक्रिया सुरू आहे.
ते पुढे म्हणाले की, पोस्टमॉर्टमची कार्यवाही सुरू असून ओळख न पटलेल्या मृतदेहांवर अत्यंत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले जातील. ज्यांची ओळख पटली आहे, त्यांच्या नातेवाईकांशी पोलीस प्रशासन संपर्कात आहे. या संपूर्ण प्रकरणी पोलीसांनी एफआयआर दाखल केली असून अपघाताच्या सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे.
मंडल आयुक्त शैलेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत काही मृतांची ओळख पटली असून उर्वरित मृतांची शिनाख्त करण्यासाठी पथके काम करत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी दृश्यता जवळपास शून्य होती. दाट धुक्यामुळे एकामागोमाग एक बसेस आणि तीन कार आपसात धडकल्या. धडक इतकी भीषण होती की काही वाहनांना स्फोटासारखी आग लागली. आगीच्या ज्वाळा उठताच बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा येथील या भीषण अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगाने राबवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमींना योग्य उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.







