भारतीय संगीतसृष्टीतील दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९३ वर्षांच्या होत्या. अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. काल संध्याकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली आणि अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.
ही दुःखद माहिती मंत्री आशिष शेलार तसेच त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यांच्या निधनामुळे संगीतविश्वावर शोककळा पसरली असून देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. आशा भोसले या भारतीय संगीतसृष्टीतील एक अजरामर नाव होत्या. त्यांनी हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजाने अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले होते. त्यांची गायकी आजही संगीतप्रेमींच्या मनात जिवंत आहे.
हे ही वाचा:
‘नमो भारत’ प्रकल्पामुळे ३ तासांत दिल्ली–ऋषिकेश प्रवास शक्य?
इराणचे नेते मोज्तबा खामेनींच्या चेहऱ्याला गंभीर दुखापती, पायही निकामी?
SIR योजनेमुळे मतदारयादीतून काढली ५ कोटी नावे
मुंबई–बेंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनला मंजुरी; रात्रीतच होणार जलद प्रवास
त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी सांयकाली ४ वाजता मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.
आशा भोसले यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टी, संगीतक्षेत्र तसेच राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीतील एक सुवर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांचा आवाज, त्यांची गाणी आणि त्यांची आठवण कायमच चाहत्यांच्या मनात जिवंत राहणार आहे.







