चेन्नई येथे आयोजित स्क्वॅश वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने अव्वल मानांकित हॉंगकॉंग (चीन) संघाचा ३–० असा दणदणीत पराभव करत इतिहास घडवला. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन करत हा क्षण देशासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटले,
“SDAT स्क्वॅश वर्ल्ड कप २०२५ मध्ये इतिहास रचत पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय स्क्वॅश संघाचे मनःपूर्वक अभिनंदन. जोशना चिनप्पा, अभय सिंह, वेलवन सेंथिल कुमार आणि अनाहत सिंह यांनी दाखवलेली जिद्द व निर्धार कौतुकास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण देशाला अभिमान वाटतो आणि या विजयामुळे तरुणांमध्ये स्क्वॅश खेळाची लोकप्रियता नक्कीच वाढेल.”
हा भारताचा या प्रतिष्ठित स्पर्धेतील पहिलाच वर्ल्ड कप विजय आहे. यापूर्वी २०२३ मध्ये भारताने कांस्यपदक पटकावले होते. मात्र यंदा भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न हरता थेट विजेतेपदावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, स्क्वॅश वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरला आहे. अंतिम सामना चेन्नईतील एक्सप्रेस अव्हेन्यू मॉल येथे खेळवण्यात आला.
अंतिम फेरीतील पहिल्या सामन्यात अनुभवी जोशना चिनप्पा यांनी हॉंगकॉंगच्या का यी ली हिचा ३–१
(७–३, २–७, ७–५, ७–१) असा पराभव करत भारताला १–० अशी आघाडी मिळवून दिली. ३९ वर्षांच्या जोशनाने आपल्या अनुभवाचा आणि कोर्टक्राफ्टचा अप्रतिम नमुना सादर केला.
दुसऱ्या सामन्यात भारताचा अव्वल पुरुष खेळाडू अभय सिंह याने एलेक्स लाउ याचा सरळ सेटमध्ये ३–०
(७–१, ७–४, ७–४) असा पराभव करत भारताची आघाडी २–० अशी वाढवली.
निर्णायक सामन्यात अवघ्या १७ वर्षांच्या युवा खेळाडू अनाहत सिंह हिने टोमाटो हो हिला ३–०
(७–२, ७–२, ७–५) ने पराभूत करत भारताचा ऐतिहासिक विजय निश्चित केला. अनाहत ही स्पर्धेतील सर्वात कमी वयाची खेळाडू होती आणि तिचा आत्मविश्वासपूर्ण खेळ सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. वेलवन सेंथिल कुमार देखील भारतीय संघाचा भाग होते, मात्र अंतिम फेरीत त्यांना खेळण्याची गरज भासली नाही.
स्पर्धेच्या प्रवासात भारताने गट टप्प्यात स्वित्झर्लंड आणि ब्राझील संघांचा ४–० असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिका संघाला ३–० ने हरवले, तर उपांत्य फेरीत दोन वेळचे विजेते इजिप्त संघालाही ३–० ने पराभूत करत भारताने अंतिम फेरीत धडक मारली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने जिद्द, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट संघभावना यांचे दर्शन घडवले.







