आंध्र प्रदेशामधील कुर्नूल जिल्ह्यातील चिन्नाटेकुरजवळ शुक्रवारी सकाळी एका खाजगी ट्रॅव्हल्स बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. त्यापैकी १८ प्रवाशांची ओळख पटवण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, अनेक मृतदेह पूर्णपणे जळाले होते, त्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे. माहितीनुसार, ही घटना पहाटे ३:३० च्या सुमारास घडली. बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेमुळे मोठी आग लागली आणि संपूर्ण गाडी जळून खाक झाली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बसच्या पुढच्या भागात आग लागली आणि नंतर ती वेगाने मागे पसरली. आग तीव्र होत असताना, १२ प्रवासी आपत्कालीन एक्झिट तोडून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आणि त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी कुर्नूल सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात झाला तेव्हा परिसरात मुसळधार पाऊस पडत होता, यामुळे ही टक्कर झाली असावी. आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. आगीचे कारण काय आहे याचा तपास अधिकारी करत आहेत.
या घटनेवर दुःख व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यामधील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत दुःख झाले आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.” पंतप्रधानांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हे ही वाचा:
माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या पुतळ्याचे अनावरण
बिल गेट्स करणार ‘तुलसी’सोबत चर्चा
निवडणूक आयोगाकडून सर्व राज्यांना एसआयआर तयारीचे निर्देश
या दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू म्हणाले, “कुर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळ झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेबद्दल ऐकून धक्का बसला आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. सरकारी अधिकारी जखमी आणि प्रभावित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करतील.”







