कारगिल विजय दिवस हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. १९९९ मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या आणि भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै रोजी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावल्याच्या त्या घटनेला यंदाच्या वर्षी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
आधीच्य युद्धात भारताने पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतरही पाकिस्तानने १९९९ साली पुन्हा कुरापती केल्या. पण, भारताने मात्र यावेळी पाकिस्तानला चारी मुंड्या चित करत त्याच्या नांग्या ठेचल्या. जवळपास ६० दिवस चाललेले हे युद्ध २६ जुलै १९९९ रोजी संपलं. या युद्धाच्या विजयाच्या स्मरणार्थ भारतात हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
साल १९९९ मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. पाकिस्तानी सैन्याने भारताच्या भूभागात घुसखोरी केली होती. भारतीय सैन्याने मोठ्या शौर्याने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावलं होतं. या युद्धामध्ये आपले ५०० हून अधिक जवान हुतात्मा झाले होते. ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिलसह लष्कराच्या इतर सर्व चौक्यांवर भारताने कब्जा मिळवला.
हे ही वाचा:
पुण्यातील पूरस्थितीत बचावकार्यासाठी लष्कराचे जवान मैदानात
अनिल देशमुख पुरावे द्या, ३ तासाच्या आत तुमच्याही ऑडियो क्लिप्स जनतेसमोर आणू !
विहार व मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागले
हिंदू प्रशिक्षणार्थींना मुस्लिमांशी लग्न करण्यासाठी दबाव
१९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धानंतरही दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष सुरूच होता. त्यात अणु चाचण्यांमुळे दोन्ही देशातील तणाव अजून वाढला होता. अशावेळी वातावरण शांत करण्यासाठी दोन्ही देशांनी फेब्रुवारी १९९९ मध्या लाहोर येथे घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. या घोषणापत्रात काश्मिरच्या मुद्द्यावर दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून शांततेनं मार्ग काढतील असा करार करण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानने सोयीस्करपणे हे विसरून पुन्हा कुरघोडी करायला सुरुवात केली. पाकिस्तानच्या सैन्याने आणि अर्ध-सैनिक दलातील जवानांनी भारतात घुसखोरी करायला सुरुवात केली. त्याला त्यांनी ‘ऑपरेशन बद्र’ असं नाव दिलं होतं. त्यानंतर भारत सरकार आणि लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ची आखणी केली.
कसा होता कारगिल युद्धाचा घटनाक्रम?
- ३ मे १९९९- कारगिलच्या डोंगराळ भागात स्थानिक मेंढपाळांनी पाकिस्तानी सैनिकांना पाहिले आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
- ५ मे १९९९- या घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराचे जवान तेथे पाठवण्यात आले. यादरम्यान पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारताचे पाच जवान शहीद झाले.
- ९ मे १९९९- पाकिस्तानी सैनिक कारगिलमध्ये पोहोचले होते. कारगिलमधील भारतीय लष्कराच्या दारूगोळा डेपोला त्यांनी लक्ष्य केले.
- १० मे १९९९- पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून द्रास आणि काकसार सेक्टरसह जम्मू आणि काश्मीरच्या इतर भागात घुसखोरी केली.
- १० मे १९९९- भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ सुरू केले.
- २६ मे १९९९- भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तर म्हणून हवाई हल्ले सुरू केले.
- १ जून १९९९- पाकिस्तानी सैन्याने हल्ला तीव्र केला आणि राष्ट्रीय महामार्ग १ ला लक्ष्य केले. फ्रान्स आणि अमेरिकेने भारताविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले.
- ५ जून १९९९- भारताने या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचा सहभाग असल्याचे उघड करणारी कागदपत्रे जाहीर केली.
- ९ जून १९९९- भारतीय लष्कराच्या जवानांनी जम्मू-काश्मीरमधील बटालिक सेक्टरमधील दोन प्रमुख स्थानांवर पुन्हा कब्जा केला.
- १३ जून १९९९- भारतीय सैन्याने टोलोलिंग शिखर पुन्हा ताब्यात घेतले. दरम्यान, भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलला भेट दिली.
- २० जून १९९९- भारतीय सैन्याने टायगर हिलजवळील महत्त्वाची जागा पुन्हा ताब्यात घेतली.
- ४ जुलै १९९९- भारतीय लष्कराने टायगर हिल ताब्यात घेतली.
- ५ जुलै १९९९- आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी कारगिलमधून पाकिस्तानी सैन्य मागे घेण्याची घोषणा केली.
- १२ जुलै १९९९- पाकिस्तानी सैन्याला माघार घ्यावी लागली.
- १४ जुलै १९९९- भारतीय पंतप्रधानांनी लष्कराचे ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी झाल्याचे जाहीर केले.
- २६ जुलै १९९९- पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यातील सर्व जागा परत घेऊन भारताने या युद्धात विजय मिळवला.







