बुधवारी (२७ ऑगस्ट) मुसळधार पावसामुळे जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथील अर्धकुमारीजवळील माता वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर झालेल्या भूस्खलनात किमान ३४ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. आणखी काही लोक अडकले असण्याची भीती असल्याने बचाव पथके ढिगाऱ्यातून शोध घेत आहेत. वैष्णोदेवी भूस्खलनावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.
“श्री माता वैष्णोदेवी मंदिर मार्गावर भूस्खलनामुळे झालेले जीवितहानी दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे होवो अशी देवाची प्रार्थना आहे. प्रशासन सर्व बाधित लोकांना मदत करत आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो, ” असे पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्टकरत म्हटले आहे.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने प्रचंड हानी केली, ज्यामुळे अचानक पूर आणि भूस्खलन झाले. जम्मूमध्ये, महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना मोठा फटका बसला, पूल कोसळले आणि वीज तारा आणि मोबाईल टॉवर्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अचानक पूर आणि पाणी साचल्याने मंगळवारपर्यंत ३,५०० हून अधिक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
हे ही वाचा :
अमेरिकेच्या भारतावरील टॅरीफची अंमलबजावणी सुरू; भारत आपल्या भूमिकेवर ठाम
गणेशोत्सवात आंदोलन; जरांगेंचा हेतू तरी काय ?
अमेरिकेला खूपतेय भारताचे स्वस्त, मस्त तरीही घातक…|
राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यात जागरूकता वाढवली
त्याच वेळी, जम्मू विभागात आज शाळा आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. या विभागात वाहणाऱ्या तीन नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. हवामान खात्याने पुढील ४० तासांत जम्मू विभागात खूप मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बसंतर, तावी आणि चिनाब नद्यांची पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. लोकांना नदीकाठ आणि पूरप्रवण क्षेत्रांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.







