दिल्लीला ४.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; पंतप्रधान मोदींकडून सतर्कतेचे आवाहन

परिसरात भीतीचे वातावरण

दिल्लीला ४.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; पंतप्रधान मोदींकडून सतर्कतेचे आवाहन

देशाची राजधानी नवी दिल्ली आणि एनसीआर परिसराला सोमवार पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. सोमवारी पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांनी नवी दिल्लीत भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र दिल्लीत होते आणि भूकंपाचे केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त ५ किमी खाली होते. दिल्लीत अचानक झालेल्या या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जोरदार भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अनेक लोक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाच्या वेळी लोक घराबाहेर उभे असलेले आणि पंखे किंवा घरातील इतर वस्तू हलत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, सुदैवाने कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही.

माहितीनुसार, दिल्लीत पहाटे ५.३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. याचे केंद्र दिल्लीच्या जवळच जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर होते. हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये २८.५९ उत्तर अक्षांश, ७७.१६ पूर्व रेखांश, ५ किमी खोलीवर झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि संभाव्य भूकंपानंतरच्या धक्क्यांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. “दिल्ली आणि जवळपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वांना शांत राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन, संभाव्य भूकंपानंतरच्या धक्क्यांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन. अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत,” असे त्यांनी ट्विट केले.

हे ही वाचा :

आयपीएलच्या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर !

‘छावा’ चित्रपटातील संभाजी महाराजांच्या हत्येच्या प्रसंगाने रसिक गलबलले!

कोण कुणाला भेटले यावरून कसे काय राजकारण होऊ शकते?

भारतातील मतदारांची संख्या वाढविण्यासाठी चक्क अमेरिका करत होती, ‘फंडिंग’

भूकंपाचे धक्के काही सेकंदांसाठी जाणवत होते. भीतीने लोक त्यांच्या घरांमधून आणि इमारतींमधून बाहेर पडले. “भूकंप इतका तीव्र होता की संपूर्ण इमारत हादरत होती,” असे गाझियाबादमधील एका रहिवाशाने सांगितले. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील एका विक्रेत्याने सांगितले की, अचानक सर्व काही हादरू लागले आणि त्याचे ग्राहकही भीतीने ओरडायला लागले. तर, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर वाट पाहणाऱ्या आणखी एका प्रवाशाने सांगितले की, “आम्हाला असे वाटले की जणू काही जमिनीखाली ट्रेन धावत आहे. सर्व काही हादरत आहे.”

Exit mobile version