भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी नुकतीच मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पाऊल मागे घेतले आहे की, काय अशा प्रकारचे आरोप केले जाऊ लागले होते. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त करत धस यांच्यावर हे आरोप करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले की, कोण कुणाला भेटले याच्यावर जर असे राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते कसे योग्य ठरेल. सुरेश धस यांनी या प्रकरणात गंभीर भूमिका घेतलेली आहे. ती सर्वांनी बघीतली आहे. ते गंभीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवादच तोडून टाकायचा असे करणे योग्य नाही. लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे. धनंजय मुंडे हे सुद्धा राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे एखादा आमदार, एखाद्या मंत्र्याला भेटला तर काय फरक पडतो?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात होते. तिथे त्यांनी आपले मत व्यक्त केले.
हे ही वाचा:
भारतातील मतदारांची संख्या वाढविण्यासाठी चक्क अमेरिका करत होती, ‘फंडिंग’
वर्षा रघुवंशी हुंडा मृत्यू प्रकरणात फईम कुरेशीला १० वर्षांची शिक्षा
मणिपूरमध्ये दोन दिवसात अकरा दहशतवाद्यांना अटक!
नरेंद्र मोदींचा ‘राजीव गांधी’ करण्यासाठी आखला जात होता कट
धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना भेटायला भाजपाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गेले होते, त्यावेळी सोबत धस हेदेखील गेले. त्यावरून त्यांच्यावर टीका होऊ लागली की, ते मॅनेज झाले आहेत का. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, उबाठाच्या सुषमा अंधारे, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी धस यांच्यावर टीका केली. त्यावरून फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे.
फडणवीस म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, हा हेतू ठेवून आमदार सुरेश धस काम करत आहे. या प्रकरणात ते पुढाकार घेत असल्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांना मात्र उत्तर दिले नाही. ते म्हणाले, मूर्खांना मी उत्तर देत नाही. हे माहीत असतानाही तुम्ही असे प्रश्न का विचारता?
मुंबईत मराठी शाळांची टक्केवारी घसरली त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, कुठल्याही मराठी शाळा बंद होणार नाही, याबाबत सातत्याने आम्ही निर्देश दिलेले आहेत. शाळा इंग्रजी असो की हिंदी असो त्यांना मराठी शिकवावे लागणार आहे. त्याची सक्ती आपण केलेली आहे.