राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मणिपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांत मणिपूरमध्ये अकरा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, ज्यात कुकी नॅशनल आर्मी (केएनए) च्या सात संशयित दहशतवाद्यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी रविवारी (१६ फेब्रुवारी) सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी चुराचांदपूरमधील ओल्ड खौकुआल भागातून संशयित केएनए दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. तर शनिवारी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील हुईकाप गावात झालेल्या दुसऱ्या एका कारवाईत, मेतेई दहशतवादी गट कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टी (पीपल्स वॉर ग्रुप) किंवा केसीपी (पीडब्ल्यूजी) च्या चार सदस्यांना अटक करण्यात आली. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून दोन एके असॉल्ट रायफल, पिस्तूल, दारूगोळा, गुन्हेगारी कागदपत्रे आणि पुस्तिका जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.
हे ही वाचा :
वर्षा रघुवंशी हुंडा मृत्यू प्रकरणात फईम कुरेशीला १० वर्षांची शिक्षा
ऑस्ट्रियामध्ये चाकू हल्ल्यात १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
बलात्कार प्रकरणी मोहम्मद निशाल या युट्यूबरला अटक
नवी दिल्ली : प्लॅटफॉर्मवर अचानक गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरी, १८ जणांचा मृत्यू!
दरम्यान, मणिपूरचे माजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात गुरुवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी ९ फेब्रुवारी २०२५ रोजी राजीनामा दिला, त्यानंतर राज्यपाल अजय भल्ला यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. मणिपूरमधील मेतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारामुळे बिरेन सिंग यांच्यावर सतत टीका होत होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.