अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्या अंतर्गत आता अनेक देशांना देण्यात येणारा निधीच त्यांनी रद्द केला आहे. आश्चर्य म्हणजे त्यात भारत आणि बांगलादेश या देशांचा संबंध आहे. प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क हे प्रमुख असलेल्या डीओजीई अर्थात डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिअन्सी या विभागाने रविवारी भारताला देण्यात येणारी २ कोटी डॉलरची तसेच बांगलादेशला देण्यात येणारी जवळपास तीन कोटी डॉलरची मदत बंद केली आहे.
भारताला जी मदत दिली जात होती, ती चक्क भारतातील मतदारांची संख्या वाढावी या उद्देशाने दिली जात होती. तर बांगलादेशातील लोकशाही मजबूत होण्यासाठी आणि बांगलादेशातील राजकीय स्थिरतेसाठी ही मदत केली जात होती. मस्क यांच्या विभागाने म्हटले आहे की, अमेरिकन करदात्यांचे पैसे ज्या कारणासाठी वापरण्यात येत होते, ते आता बंद करण्यात आले आहेत. मस्क यांनी म्हटले आहे की, जर असाच निधी दिला गेला तर अमेरिका ही दिवाळखोरीत जाईल.
यावर भारतीय जनता पार्टीचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, मोल्दोवामध्ये निवडणूक आणि राजकीय प्रक्रिया मजबूत करण्यासाठी ४८ कोटी डॉलर इतकी रक्कम दिली जात होती तर भारतातील मतदारांची संख्या वाढविण्यासाठी २ कोटी डॉलर इतकी मदत केली जात होती. मतदारांची संख्या वाढावी म्हणून भारताला २ कोटी डॉलर इतकी रक्कम का दिली जात होती? भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील हा हस्तक्षेप आहे. यातून कुणाला फायदा होणार आहे. नक्कीच सत्ताधारी पक्षाला याचा फायदा होणार नाही.
हे ही वाचा:
अमेरिकेतून ११६ जण भारतात आले, त्यातले दोघे खून करून झाले होते फरार!
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा ताज कोणाच्या नशिबी?
नरेंद्र मोदींचा ‘राजीव गांधी’ करण्यासाठी आखला जात होता कट
कुंभ का कोई मतलब नहीं है, यह फालतू है!
ज्या देशांना असे निधी दिले जात होते त्यात मोझांबिकला १ कोटी डॉलर, कंबोडियन युवकाच्या कौशल्य विकासासाठी ९७ लाख डॉलर, कंबोडियातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बळकटीसाठी २३ लाख डॉलर, प्रागमधील नागरी संस्थेसाठी ३ कोटी डॉलर, लैंगिक समानता आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी ४ कोटी डॉलर, सर्बियाला १ कोटी ४० लाख डॉलर, लायबेरियातील मतदारांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी १५ लाख डॉलर, नेपाळसाठी १ कोटी ९० लाख डॉलर, दक्षिण आफ्रिकेतील सर्वसमावेशक लोकशाहीसाठी ४ कोटी ७० लाख डॉलर तसेच इजिप्त कोसोवो, अशकाली यासाठी २० लाख डॉलर.
डीओजीई ही संस्था मस्क यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली असून त्याअंतर्गत अनेक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या निधीच्या रकमेवर कात्री चालविली जाणार आहे. त्यामुळे सध्या डोनाल्ड ट्रम्प हे मस्क यांच्यावर खुश आहेत. सरकारी उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने डीओईजी नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे. नुकतीच ट्रम्प यांनी या संस्थेची तारीफ करताना त्यांच्यामुळे अब्जावधी डॉलरची बचत करता आली आहे, असे वक्तव्य केले होते.