दिल्लीत सरकार स्थापनेशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. उद्या १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा शपथविधी समारंभ १९ किंवा २० फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव करत भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला. तब्बल २७ वर्षानंतर भाजपा दिल्लीत सत्तेवर आली. भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकल्या तर आपला फक्त २२ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया सारख्या मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामनाही करावा लागला.
दरम्यान, दिल्लीत भाजपाने सत्ता काबीज केली. परंतु, अद्याप मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचेही नाव निश्चित झालेले नाहीये. मुख्यमंत्री पदासाठी अनेक नेत्यांच्या क्रमवारीत परवेश वर्मा यांचे नाव अव्वल असल्याची माहिती आहे. मात्र, पक्ष नेतृत्वाने मौन बाळगले आहे.
हे ही वाचा :
संजय राऊतांच्या हातात आता बांगलादेश द्यावा, काहीही मुर्खासारखे…
अमेरिकेतून ११६ जण भारतात आले, त्यातले दोघे खून करून झाले होते फरार!
मणिपूरमध्ये दोन दिवसात अकरा दहशतवाद्यांना अटक!
‘खोया-पाया’ केंद्राची कमाल, महाकुंभ मेळ्यात हरवलेल्या २० हजार भाविकांना आणले एकत्र!
परवेश वर्मा यांच्याव्यतिरिक्त, सर्वोच्च पदाच्या इतर दावेदारांमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते आणि दिल्ली विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजेंदर गुप्ता, ब्राह्मण नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय, केंद्रीय नेत्यांशी जवळचे संबंध म्हणून ओळखले जाणारे दिल्ली भाजपचे सरचिटणीस आशिष सूद, आणि वैश्य समुदायाचे संघाचे मजबूत प्रतिनिधी जितेंद्र महाजन यांचा समावेश आहे.
तथापि, पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रीय नेतृत्वाकडून मुख्यमंत्री म्हणून एखाद्या महिलेची निवड करण्याची किंवा पूर्णपणे नवीन चेहरा निवडण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत. यामध्ये रेखा गुप्ता आणि शिखा रॉय यांची नावाची चर्चा आहे. त्यानुसार मुख्यमंत्री निवडीबाबत आता उद्या १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. तर शपथविधी समारंभ १९ किंवा २० फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.