दोन तास ईडी आणि सीबीआय आमच्या हातामध्ये दिल्यास गृहमंत्री अमित शाह देखील मातोश्रीवर येवून शिवसेनेत पक्ष प्रवेश करतील, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युतर दिले आहे. ‘संजय राऊतांच्या हातात आता बांगलादेश द्यावा,’ असा टोला शिरसाट यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी भाजपाचा हात पकडला. अजूनही अनेक माजी मंत्री, खासदार, आमदार आणि नगरसेवकांसह कार्यकर्त्ये भाजपामध्ये सामील होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम पाहून भाजपात सहभागी होत असल्याचे या सर्वांनी सांगितले. मात्र, ईडी, सीबीआयसारख्या एजन्सीच्या भीतीपोटी हे लोक भाजपात सामील होत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. याच दरम्यान, या तपास यंत्रणांवरून संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली.
संजय राऊत म्हणाले, सत्ता आहे म्हणून यांचे ऑपरेशन, सत्ता गेल्यानंतर यांचे दुकान खाली होईल. दोन तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या गृहमंत्री अमित शाह देखील मातोश्रीवर येवून शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत.
हे ही वाचा :
अमेरिकेतून ११६ जण भारतात आले, त्यातले दोघे खून करून झाले होते फरार!
तिकीट विक्रीत अचानक झालेली वाढ हेच चेंगराचेंगरीचे कारण
मणिपूरमध्ये दोन दिवसात अकरा दहशतवाद्यांना अटक!
वर्षा रघुवंशी हुंडा मृत्यू प्रकरणात फईम कुरेशीला १० वर्षांची शिक्षा
यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांना टोला लगावला. ते म्हणाले, संजय राऊतांच्या हातात आता बांगलादेश द्यावा, काहीही मुर्खासारखे वक्तव्य करायचे. तपास यंत्रणा कोणाच्या बांधिलकी नसून स्वतंत्र आहेत. भाजपाच्या हातामध्ये यंत्रणा असत्या तर तुम्हाला जेलमध्ये का टाकले नाही, तुम्ही आतापर्यंत बाहेर कसे ?, असे शिरसाट म्हणाले.
भाजपा नेते गिरीश महाजन यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, यांची सध्याची परिस्थिती सर्वाना माहिती आहे आणि देश-राज्य हातामध्ये द्या म्हणत आहेत. संजय राऊत सकाळपासून काहीही बडबडतात, ते जोकरच्या भूमिकेत आहेत, असे महाजन म्हणाले.