७ तास, ३०० पर्यटक; बंद पडलेल्या गुलमर्ग रोपवेसाठी कशी राबवली बचाव मोहीम?

पर्यटक तासनतास हवेतच अडकून पडले

७ तास, ३०० पर्यटक; बंद पडलेल्या गुलमर्ग रोपवेसाठी कशी राबवली बचाव मोहीम?

जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटक स्थळ असलेले गुलमर्ग येथे गोंडोला (केबल कार) हे एक आकर्षण आहे. मात्र, या गोंडोला केबल कारमध्ये सोमवारी (२५ मे) तांत्रिक बिघाड झाल्याने गोंधळ उडाला होता. सेवा अचानक बंद पडल्यामुळे काही पर्यटक केबल कारच्या डब्यांमध्ये हवेत अडकले, त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आशियातील या सर्वात उंच रोपवेच्या ६५ केबिन्समध्ये ३०० हून अधिक पर्यटक तासनतास हवेतच अडकून पडले, अशी आकडेवारी समोर आली आहे. यानंतर अनेक संस्थांनी मिळून सात तासांची मोठी बचाव मोहीम राबवली आणि सर्वांची सुखरूप सुटका केली.

बचावकार्यामध्ये अडकलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले, त्यांपैकी काही जण जमिनीपासून सुमारे ५०० फूट उंचीवर लटकणाऱ्या केबिनमध्ये अडकले होते, असे वृत्तसंस्था पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले. अधिकाऱ्यांनी असेही म्हटले की, परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. दुपारच्या सुमारास झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर केबल कार सेवेच्या दोन्ही टप्प्यांमधील कामकाज तात्काळ स्थगित करण्यात आले.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या पथकांनी एकत्रितपणे दोरी आणि शिड्यांचा वापर करून पर्यटकांना सुरक्षितपणे खाली आणले. जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात म्हणाले की, स्थानिक लोक आणि गुलमर्ग पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने केबल कार प्रकल्पाचे बचाव पथक घटनास्थळी सर्वात आधी पोहोचले होते. नंतर, एसडीआरएफ आणि सशस्त्र पोलिसांच्या पर्वतीय बचाव दलाच्या एकूण १५ पथकांनी एक मोठी मोहीम सुरू केली. त्यांना भारतीय लष्कर आणि एनडीआरएफने मदत केली आणि आम्ही सर्व अडकलेल्या लोकांना वाचवले, असे ते म्हणाले. तसेच, केबल कारच्या लटकत्या केबिनमधून सुमारे ३२० लोकांना बाहेर काढण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. अडकलेल्यांपैकी बहुतेक जण चालत खाली उतरले, तर शारीरिकदृष्ट्या पुरेसे तंदुरुस्त नसलेल्या ४५ जणांना स्ट्रेचरवरून वाहून आणण्यात आले. संपूर्ण ऑपरेशन सुमारे ७ तास चालले.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सूचनेनुसार, उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी हे स्थानिक आमदार फारूक अहमद शाह यांच्यासमवेत बचाव कार्याची देखरेख करण्यासाठी तातडीने पर्यटन स्थळी पोहोचले. दुपारपर्यंत १७९ पर्यटकांना खाली उतरवण्यात आले होते, तर पथकांनी एकेक करून केबिन रिकाम्या केल्यामुळे उर्वरित प्रवाशांना टप्प्याटप्प्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. बचावकार्य संपले असून, सर्व अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती डीजीपी प्रभात यांनी गुलमर्ग येथे पत्रकारांना दिली.

हे ही वाचा:

गुलमर्गमधील गोंडोला केबल कारसेवा अचानक पडली बंद आणि…

बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीशी संबंधित दहशतवादी निधी प्रकरणात छापेमारी

एआयएडीएमकेच्या तीन आमदारांचा राजीनामा; टीव्हीके पक्षात केला प्रवेश

जागतिक स्तरावर तेलाच्या किमती घसरल्या तरी भारतात इंधन दरवाढ का?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह , जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आपत्ती निवारण दलांच्या भूमिकेचे कौतुक केले. अब्दुल्ला म्हणाले की, या घटनेची चौकशी केली जाईल आणि काही त्रुटी आढळल्यास कारवाई केली जाईल.

गुलमर्ग गोंडोला ही आशियातील सर्वात उंच केबल कार सेवा आहे. पूर्वी या सेवेत तांत्रिक अडथळे आले आहेत, ज्यात गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तात्पुरती स्थगिती देण्याचाही समावेश आहे. २५ जून २०१७ रोजी एक मोठी दुर्घटना घडली, जेव्हा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उन्मळून पडलेले झाड एका केबिनवर कोसळले, ज्यामुळे झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version