अमेरिकेत ८५ हजारांचे कॅन्सरचे औषध भारतात फक्त ३५ रुपयांना!

भारतातील स्वस्त आणि परवडणाऱ्या औषधांची जगभरात चर्चा

अमेरिकेत ८५ हजारांचे कॅन्सरचे औषध भारतात फक्त ३५ रुपयांना!

भारतातील स्वस्त आणि परवडणाऱ्या औषधांची पुन्हा एकदा जगभरात चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेतील एका महिलेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अमेरिकेत एका कॅन्सरच्या औषधाच्या एका गोळीची किंमत सुमारे ८५ हजार असताना, त्याच औषधाचे भारतीय जेनेरिक पर्याय अवघ्या ₹३५ ते ₹३०० मध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले. या प्रचंड किंमतफरकामुळे ती आश्चर्यचकित झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून भारताच्या जेनेरिक औषध उद्योगाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

व्हिडिओमध्ये महिलेने ‘रेव्हलिमिड’ (Revlimid) या रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रँडेड औषधाचा उल्लेख केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत या औषधाच्या एका गोळीची किंमत सुमारे ९०० ते १,००० अमेरिकी डॉलर (सुमारे ₹८५ हजार) आहे. मात्र भारतात त्याच सक्रिय घटक लेनालिडोमाइड (Lenalidomide) असलेल्या जेनेरिक औषधांची किंमत ₹३५ ते ₹३०० दरम्यान असल्याचे तिने सांगितले. भारतातील औषधांच्या किमती पाहून संबंधित महिलेने व्हिडिओमध्ये, “अमेरिकेत आमची लूट होत आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. भारतात कमी किमतीत दर्जेदार औषधे उपलब्ध असल्याचे सांगत तिने भारतीय आरोग्य व्यवस्थेचे आणि औषधनिर्मिती क्षेत्राचे कौतुक केले. तिचा हा व्हिडिओ काही दिवसांतच लाखो लोकांपर्यंत पोहोचला.

भारत हा जगातील सर्वात मोठ्या जेनेरिक औषध उत्पादक देशांपैकी एक मानला जातो. भारतातून शेकडो देशांना परवडणाऱ्या किमतीत औषधांचा पुरवठा केला जातो. कर्करोग, मधुमेह, हृदयविकार आणि इतर गंभीर आजारांवरील अनेक औषधांचे जेनेरिक पर्याय भारतात उपलब्ध असल्यामुळे लाखो रुग्णांना त्याचा लाभ होतो.

हे ही वाचा:

भारतीय खलाशाच्या मृत्यूनंतर भारताकडून इराण राजदूतांना समज

प्रसूतीनंतर १८ महिलांचा मृत्यू; सात जणी डायलिसिसवर

“मोजतबा खामेनेई ९०% संपलेत”

४२ नरेंद्र मोदी स्टेडियमएवढी रेल्वेची जमीन अतिक्रमणाखाली

भाजपच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील आरोग्यसेवा अधिक सुलभ, परवडणारी आणि दर्जेदार झाल्याचा दावा करण्यात आला. तसेच, भारत हा केवळ ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ नसून जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारा देश बनत असल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version