न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी समय रैनाला १० लाखांचा दंड

सर्वोच्च न्यायालयाचा दणका

न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी समय रैनाला १० लाखांचा दंड

कॉमेडियन समय रैना याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (१३ जुलै) जोरदार दणका दिला. न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आणि न्यायालयासमोर दिलेल्या आश्वासनांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर १० लाख रुपयांचा दंड ठोठावला. ही रक्कम दोन आठवड्यांच्या आत जमा करण्याचे आदेश देताना, आदेशाचे पालन न केल्यास सक्तीची कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही न्यायालयाने दिला.

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती जे. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट शब्दांत म्हटले की, समय रैनाने न्यायालयासमोर दिलेल्या आश्वासनांचे पालन केले नाही आणि त्याचे वर्तन न्यायालयासमोर केलेल्या वचनांशी विसंगत आहे. त्यामुळे त्याने प्रत्यक्षात न्यायालयाची फसवणूक केली असल्याचे गंभीर निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

ही कारवाई ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वादरम्यान करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांशी संबंधित याचिकांवरील सुनावणीदरम्यान करण्यात आली. या प्रकरणात कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहाबादिया, आशिष चंचलानी आणि क्युअर एसएमए फाउंडेशन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सुनावणीदरम्यान क्युअर एसएमए फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ वकील अपराजिता सिंग यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, न्यायालयासमोर आश्वासन दिल्यानंतरही समय रैनाने ना क्युअर एसएमए फाउंडेशनशी संपर्क साधला, ना स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी (SMA) या दुर्मिळ आजाराने ग्रस्त व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अपराजिता सिंग यांनी न्यायालयात तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले, “समय रैना कार्यक्रम करत आहे, पण न्यायालयाच्या आदेशानुसार त्याने एसएमए फाउंडेशनशी किंवा एसएमएने ग्रस्त असलेल्या व्यक्तींशी संपर्क साधलेला नाही. तो कोणत्या प्रकारचा युवा आयकॉन आहे हे मला कळत नाही. याचा विचार करूनही माझ्या अंगावर काटा येतो.”

या युक्तिवादाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की, न्यायालयासमोर दिलेली आश्वासने ही केवळ औपचारिकता नसून त्यांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. न्यायालयासमोर एक भूमिका मांडून प्रत्यक्षात त्याच्या विरोधात वागणे स्वीकारार्ह नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. न्यायालयाने समय रैनाला दोन आठवड्यांच्या आत १० लाख रुपयांचा दंड जमा करण्याचे निर्देश दिले. तसेच आदेशाचे पालन न झाल्यास त्याच्याविरुद्ध पुढील सक्तीची कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

हे ही वाचा:

व्यापारी जहाजांवरील हल्ले तात्काळ थांबवा!

जगन्नाथ रथयात्रेपूर्वी मोठा कट उधळला; ५ दहशतवादी अटकेत

विनयभंग केल्याचा जाब विचारला म्हणून कुटुंबाचा २० किलोमीटर पाठलाग, गाडीही फोडली

ट्रम्प यांच्या २०% टोल प्रस्तावाने जागतिक बाजार हादरला

प्रकरण का चर्चेत आले?

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील काही वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर या प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली होती. सुनावणीदरम्यान काही सामाजिक बांधिलकीची पावले उचलण्याबाबत आणि एसएमएग्रस्त रुग्णांशी संपर्क साधण्याबाबत समय रैनाने आश्वासन दिले होते. मात्र, ते प्रत्यक्षात पूर्ण न झाल्याचा दावा क्युअर एसएमए फाउंडेशनने केला. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत समय रैनावर १० लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Exit mobile version