मुंबईतील शालीमार, नूर मोहम्मदीसह तीन रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

एफडीएची मोठी कारवाई

मुंबईतील शालीमार, नूर मोहम्मदीसह तीन रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

मुंबईतील प्रसिद्ध खाद्यपदार्थांसाठी ओळखल्या जाणाऱ्या शालीमार, नूर मोहम्मदी आणि रहमानिया या तीन रेस्टॉरंटवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने या तिन्ही रेस्टॉरंटचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

संबंधित कारवाई १३ जुलै रोजी करण्यात आलेल्या तपासणीनंतर करण्यात आली. भेंडी बाजारातील शालीमार आणि नूर मोहम्मदी, तसेच उमरखाडी येथील रहमानिया रेस्टॉरंटमध्ये अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले. एफडीएने सांगितले की, शालीमार रेस्टॉरंटची यापूर्वी एप्रिल महिन्यात तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी अनेक त्रुटी आढळल्याने सुधारणा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, १३ जुलै रोजी झालेल्या पुनर्तपासणीत २५ प्रमुख त्रुटी अद्यापही दूर करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे १४ जुलै रोजी त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला.

तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील ओले व घसरडे मजले, कच्च्या मालाच्या खरेदीची नोंद नसणे, पिण्याच्या पाण्याच्या चाचणीचे अहवाल उपलब्ध नसणे, खाद्यतेलाच्या गुणवत्तेच्या नोंदींचा अभाव, शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ स्वतंत्रपणे न ठेवणे तसेच कीटक प्रतिबंधक जाळी नसलेल्या उघड्या खिडक्या आढळून आल्या.

भेंडी बाजारातील प्रसिद्ध नूर मोहम्मदी रेस्टॉरंटमध्येही अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. कबाब विभागाजवळील स्वयंपाकघराच्या मजल्यावर काळ्या तेलाचा जाड थर साचलेला होता. याशिवाय उघड्या खिडक्यांमुळे माशा, कीटक आणि पक्ष्यांना सहज प्रवेश मिळत असल्याचे दिसून आले. तसेच भिंतींवर तेलाचे व रंगाचे डाग, अस्वच्छ व जुनी भांडी, कच्च्या मालाच्या साठवणुकीतील त्रुटी, पुरवठादारांच्या नोंदींचा अभाव आणि पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचण्यांची नोंद नसल्याचेही एफडीएने नमूद केले आहे.

उमरखाडीतील रहमानिया रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थ, रसायने आणि पॅकेजिंग साहित्याची अपुरी साठवण व्यवस्था, गंजलेली आणि निकृष्ट दर्जाची उपकरणे, भिंती व छतावरील निघालेला रंग व प्लास्टर, कीटक प्रतिबंधक व्यवस्था नसणे तसेच अन्न आणि पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या नोंदी उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यामुळे या रेस्टॉरंटचाही परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.

हे ही वाचा:

भारत-चीनला अमेरिकेकडून मिळणार दिलासा? ५००% ऐवजी १००% शुल्काचा प्रस्ताव

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क, पुण्यातल्या ६६ जणांची चौकशी

न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी समय रैनाला १० लाखांचा दंड

व्यापारी जहाजांवरील हल्ले तात्काळ थांबवा!

एफडीएने राज्यभर ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्नसुरक्षेची व्यापक तपासणी सुरू केली आहे. या विशेष मोहिमेत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, दुग्धजन्य पदार्थ उत्पादक, तसेच बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवरही कारवाई करण्यात आली. १३ जुलै रोजी राज्यभरात अनेक धाडी टाकून सुमारे १.६८ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच ३२ हॉटेल्स आणि खाद्यव्यवसायांची तपासणी करून आठ आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या, तर चार खाद्य व्यवसायांचे परवाने निलंबित करण्यात आले.

Exit mobile version