नाशिकमधील एका महिलेने विनयभंग सहन न करता आरोपींना जाब विचारला. तिच्या पतीनेही तिची साथ दिली. मात्र त्यानंतर जे घडले, त्याने संपूर्ण कुटुंब हादरून गेले.नाशिकमधील आठ जणांचे एक कुटुंब, ज्यामध्ये चार लहान मुले होती, रविवारी इगतपुरी येथील भावली धरण आणि धबधबा परिसरात सहलीसाठी गेले होते. मात्र, आनंदाचा हा प्रवास क्षणात भीषण अनुभवात बदलला.
तेथे दोन जणांनी महिलेचा कथित विनयभंग केला. कुटुंबीयांनी त्यास विरोध करताच आरोपींनी त्यांचा तब्बल २० किलोमीटरपर्यंत पाठलाग केला आणि लोखंडी रॉडने त्यांच्या कारची तोडफोड केली. केवळ महिलेच्या विनयभंगाला विरोध केल्यामुळे आणि आरोपींना जाब विचारल्यामुळे हा हल्ला झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणात आता ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीडित महिलेने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, आरोपी इतके बिनधास्तपणे २० किलोमीटरपर्यंत पाठलाग करून भररस्त्यात हल्ला करतील, याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. ती म्हणाली, “आरोपी आमचा पाठलाग करून आमच्यावर हल्ला करतील, असे आम्हाला अजिबात वाटले नव्हते. त्यांनी लोखंडी रॉडने आमच्या कारवर हल्ला केला. चारही बाजूंनी ते आमचा पाठलाग करत होते. आम्ही काय सहन केले, हे शब्दांत सांगता येणार नाही.”
हे ही वाचा:
ट्रम्प यांच्या २०% टोल प्रस्तावाने जागतिक बाजार हादरला
भारत-यूके मुक्त व्यापार करार लागू
प्रसूतीनंतर १८ महिलांचा मृत्यू; सात जणी डायलिसिसवर
मध्यपूर्वेत युद्धाची धग वाढली, अमेरिकेला इराणचे चोख प्रत्युत्तर
पीडितेने सांगितले की, आम्ही सहलीसाठी गेलो होतो. जेवण केले, पाण्यात खेळलो आणि परतण्याच्या तयारीत होतो. त्याच वेळी तेथील दोन जणांनी माझे नाव घेत मला हाक मारली आणि माझा विनयभंग करण्यास सुरुवात केली. मी त्यांना खडसावले. माझ्या पतीनेही त्यांना जाब विचारला आणि सार्वजनिक ठिकाणी एका महिलेला का त्रास देत आहात, असा प्रश्न केला.”
यामुळे आरोपी संतापले. काही वेळातच तेथील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर काम करणारे आणखी काही जण त्यांच्यात सामील झाले. पीडित महिला म्हणाली, क्षणात १० ते १२ जण जमा झाले आणि आमच्यावर धावून आले. कुटुंबीयांनी परिस्थिती शांत करण्याचा आणि तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी माघार घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी कुटुंबीयांना शिवीगाळ सुरूच ठेवली.
महिलेने सांगितले, “थोड्या वादानंतर आम्ही निघण्याचा प्रयत्न केला. कारमध्ये बसताच त्यांनी आमचा रस्ता अडवला आणि कारच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर जवळपास २० किलोमीटर आमचा पाठलाग केला. लोखंडी रॉडने कारची प्रचंड तोडफोड केली. आमची कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.”
तिने सांगितले की, हल्लेखोरांची संख्या १० ते १२ होती आणि त्यांपैकी बहुतेकांना ती ओळखू शकते. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे.
हल्ला झाला तेव्हा कारमध्ये चार लहान मुले होती. “मुले अजूनही प्रचंड घाबरलेली आहेत,” असे पीडितेने सांगितले. हल्ल्याच्या धाडसाबद्दल बोलताना ती म्हणाली, “जिथे जिथे वाहतूक कोंडी होत होती आणि त्यांना आम्हाला गाठता येत होते, तिथे तिथे ते कारवर हल्ला करत होते. काही जण दुचाकीवरून आमच्या कारचा पाठलाग करत होते.”
“आम्ही गाडी थांबवली असती, तर ते आमच्यावर हल्ला करून आम्हाला ठार मारले असते, अशी भीती आम्हाला वाटत होती,” असेही ती म्हणाली. एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी छेडण्याचे आणि विरोध केल्यावर इतक्या हिंसक पद्धतीने हल्ला करण्याचे धाडस या आरोपींना कसे झाले, असा सवालही तिने उपस्थित केला.
“मी घाबरून गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. भविष्यातही माझ्यासोबत असा प्रकार घडला, तर मी त्याला ठामपणे विरोध करेन,” असे तिने स्पष्ट केले. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत ती म्हणाली, “या आरोपींवर कठोर कारवाई झाली, तर इतरांसाठीही तो धडा ठरेल.”







