नेपाळमधील चितवन राष्ट्रीय उद्यानालगतच्या माडी भागातील एका कुटुंबाची हृदयद्रावक कहाणी संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी ठरली आहे. तब्बल १४ वर्षांच्या कालावधीत ‘धुर्बे’ नावाच्या एका रानटी हत्तीने एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा बळी घेतला. योगायोग म्हणावा की नियतीचा क्रूर खेळ, पण या कुटुंबाने कितीही ठिकाण बदलले तरी मृत्यू जणू त्यांचा पाठलाग करतच राहिला.
या भीषण घटनेची सुरुवात २०१२ मध्ये झाली. शनिचरा बोटे यांच्या आई-वडिलांवर ‘धुर्बे’ हत्तीने अचानक हल्ला करून त्यांना चिरडून ठार केले. या घटनेनंतर भयभीत झालेल्या कुटुंबाने आपले घर, शेती आणि गाव सोडण्याचा निर्णय घेतला. सुमारे ३० किलोमीटर दूर असलेल्या जगतपूर येथे त्यांनी नव्याने संसार उभा केला. जुन्या आठवणी मागे टाकून सुरक्षित आयुष्य जगता येईल, अशी त्यांची अपेक्षा होती.
हे ही वाचा:
जगन्नाथ रथयात्रेपूर्वी मोठा कट उधळला; ५ दहशतवादी अटकेत
E20 पेट्रोलवरून सौरव जोशीचा यू-टर्न
विनयभंग केल्याचा जाब विचारला म्हणून कुटुंबाचा २० किलोमीटर पाठलाग, गाडीही फोडली
संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या अमेरिकन नागरिकाला उत्तर प्रदेशात पकडले
मात्र १४ वर्षांनंतर नियतीने पुन्हा त्यांच्यावर घाला घातला. जुलै २०२६ मध्ये तोच ‘धुर्बे’ हत्ती जगतपूर परिसरात पोहोचला. मध्यरात्री त्याने शनिचरा बोटे यांच्या घरावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांची २५ वर्षीय सून आशिका बोटे आणि अवघा चार वर्षांचा नातू भरत यांचा जागीच मृत्यू झाला. एका कुटुंबातील चार सदस्यांना एकाच हत्तीने वेगवेगळ्या काळात ठार मारल्याची ही अत्यंत दुर्मीळ आणि धक्कादायक घटना ठरली आहे.
विशेष म्हणजे, २०१२ मधील पहिल्या हल्ल्यानंतर नेपाळच्या वन विभागाने ‘धुर्बे’चा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रेडिओ कॉलर लावण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र हा हत्ती पुन्हा जंगलात गायब झाला आणि अनेक वर्षांनी अचानक समोर येत त्याने पुन्हा या कुटुंबावर मृत्यूची सावली आणली.
स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, ‘धुर्बे’ हा नेपाळमधील सर्वाधिक धोकादायक रानटी हत्तींपैकी एक मानला जातो. गेल्या अनेक वर्षांत त्याच्यावर २५ हून अधिक लोकांचा बळी घेतल्याचे आरोप आहेत. त्यामुळे त्याला पकडणे आणि मानववस्तीपासून दूर ठेवणे हे वन विभागासमोर मोठे आव्हान बनले आहे.
या हृदयद्रावक घटनेने मानव आणि वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जंगलांचे कमी होत चाललेले क्षेत्र, वन्यजीवांच्या अधिवासावर वाढणारे अतिक्रमण आणि मानवी वस्त्यांचा विस्तार यामुळे अशा घटना वाढत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वन्यजीवांचे संरक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच वनक्षेत्रालगत राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताचे संरक्षणही आवश्यक असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे.
