भारताच्या सर्वात मोठ्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे डार्क वेबवर लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रॅन्समवेअर गट ‘वर्ल्ड लीक्स’ने प्रकल्पाशी संबंधित हजारो फाईल्स ऑनलाइन प्रसिद्ध केल्याचा दावा केला आहे. या फाईल्समध्ये आराखडे (ब्लूप्रिंट्स), पुरवठादारांची माहिती, उपकरणांच्या तपासणी अहवालांसह इतर संवेदनशील दस्तऐवज असल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणात उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने त्यांच्या तृतीय पक्ष डेटा सेंटर सेवा पुरवठादार योट्टा (Yotta) यांच्या सर्व्हरवर आंशिक डेटा भंग (Partial Data Breach) झाल्याची पुष्टी केली आहे. याबाबत केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, डार्क वेबवर टाकण्यात आलेल्या सुमारे ८.५८ लाख फाईल्सपैकी १९ हजार फाईल्स अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगितले जात आहे. या कागदपत्रांमध्ये २०१६ ते २०२५ या कालावधीतील माहिती असून, त्यात प्रकल्पाचे काही ब्लूप्रिंट्स, पुरवठादारांची यादी, उपकरणांच्या तपासणी नोंदी, बैठकींचे दस्तऐवज आणि विमा पॉलिसींचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. मात्र, या दस्तऐवजांची स्वतंत्रपणे सत्यता पडताळली गेलेली नाही.
या लीक झालेल्या फाईल्समध्ये अणुभट्टीच्या मुख्य (Core Reactor) प्रणालीशी संबंधित माहिती नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. रशियाची सरकारी कंपनी रोसाटॉम ही अणुभट्टीच्या मुख्य प्रणालीची पुरवठादार आहे. मात्र, युनिट ३ आणि ४ च्या वायुवीजन, शीतकरण प्रणाली तसेच कॉमन कंट्रोल रूमच्या आराखड्यांशी संबंधित माहिती या फाईल्समध्ये असल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) आणि न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) यांनी तपास सुरू केला आहे. NPCIL आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यात या डेटा भंगासंदर्भात समन्वय सुरू असल्याचेही समोर आले आहे. योट्टा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या सर्व्हरवर संशयास्पद हालचाली आढळल्या होत्या. त्यानंतर संभाव्य रॅन्समवेअर हल्ला तात्काळ रोखण्यात आला. मात्र, जूनच्या अखेरीस रिलायन्सकडून बाह्य सायबर हल्लेखोरांनी डेटा चोरी केल्याचा दावा केल्याची माहिती मिळाली. योट्टाने या दाव्याची स्वतंत्र पुष्टी केलेली नसली तरी तांत्रिक तपासाचा अहवाल रिलायन्सला दिला असून, तपासात सहकार्य करत असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा:
ममतांची साथ सोडत तृणमूलचे मदन मित्रा बंडखोर गटात
बंगालमधील सरकार बदलल्यामुळे तस्लिमा नसरिन १९ वर्षांनी कोलकात्यात येणार
पीओके आंदोलनात लष्कर, जैशच्या दहशतवाद्यांना घुसवण्याचा कट?
मुंबईमधील कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारला आग
सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, लीक झालेल्या दस्तऐवजांमध्ये अणुभट्टीच्या मुख्य प्रणालीची माहिती नसली तरी सहाय्यक पायाभूत सुविधा, पुरवठादारांची साखळी आणि सुरक्षा व्यवस्थेबाबतची माहिती चुकीच्या व्यक्तींच्या हाती गेल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे या प्रकाराकडे गंभीरतेने पाहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित हा पहिलाच सायबर सुरक्षा प्रकार नाही. २०१९ मध्येही प्रकल्पाच्या प्रशासकीय नेटवर्कमध्ये उत्तर कोरियाशी संबंधित मालवेअर आढळले होते. त्यावेळी केंद्र सरकारने स्पष्ट केले होते की, अणुभट्टीच्या नियंत्रण प्रणाली इंटरनेटपासून पूर्णपणे वेगळ्या असल्याने प्रकल्पाच्या कार्यावर कोणताही परिणाम झाला नव्हता.







