26 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरविशेषब्रह्मपुत्रेच्या पोटात विकासाची नवी वाट!

ब्रह्मपुत्रेच्या पोटात विकासाची नवी वाट!

Google News Follow

देशातील प्रमुख आणि विशाल नद्यांपैकी एक म्हणजे ब्रह्मपुत्रा! या नदीने आसामच्या भूगोलाला, अर्थव्यवस्थेला आणि जनजीवनाला आकार दिला आहे. मात्र, आता याच ब्रह्मपुत्रेच्या खालून विकासाचा एक नवा मार्ग तयार होणार आहे. नदीवरून पूल बांधण्याऐवजी आता तिच्या खालूनच रस्ता आणि रेल्वेसाठी टनेल उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे, रस्ता आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक व्यवस्थांचा समावेश असलेला हा भारतातील पहिला अंडरवॉटर रोड-कम-रेल टनेल असणार आहे. हा प्रकल्प भारताच्या पायाभूत सुविधा विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीखाली उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र, या प्रकल्पाचे महत्त्व केवळ नदीच्या एका तीराला दुसऱ्या तीराशी जोडण्यापुरते मर्यादित नाही. तर, ईशान्य भारतातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.

प्रकल्पाचे भौगोलिक स्थान आणि रचना

आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांना जोडणारा हा प्रकल्प आहे. गोहपूर हे नॅशनल हायवे- १५ (NH-15) वर, तर नुमालीगड हे नॅशनल हायवे ७१५ (NH-715) वर आहे. या दोन्ही ठिकाणांना जोडण्यासाठी सुमारे ३३.७ किलोमीटर लांबीचा चारपदरी, नियंत्रित प्रवेश असलेला ग्रीनफिल्ड कॉरिडॉर उभारला जाणार आहे. यातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीखालून जाणारा १५.७९ किलोमीटरचा ट्विन-ट्यूब टनेल. या संपूर्ण प्रकल्पासाठी १८ हजार ६६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

टनेलची रचना नेमकी कशी असेल?

या प्रकल्पात दोन स्वतंत्र भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत. याला ‘ट्विन ट्यूब’ म्हणतात. या दोन्ही मार्गांमधून रस्ते वाहतूक होईल. प्रत्येक मार्गावर वाहनांसाठी दोन लेन असतील. विशेष म्हणजे, यातील एका भुयारी मार्गात रेल्वे वाहतुकीसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. म्हणजेच, एकाच प्रकल्पातून रस्ते आणि रेल्वे अशा दोन्ही प्रकारच्या वाहतुकीला सुविधा मिळणार आहे.

हा भुयारी मार्ग तयार करण्यासाठी टनेल बोरिंग मशीन म्हणजेच TBM या अत्याधुनिक यंत्राचा वापर केला जाणार आहे. हे यंत्र जमिनीखालून मोठ्या व्यासाचा बोगदा खोदत पुढे जाते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने टप्प्याटप्प्याने खोदकाम करण्याची गरज कमी होते. संपूर्ण प्रकल्प EPC पद्धतीने उभारला जाणार आहे. म्हणजेच, बोगद्याचे डिझाइन तयार करणे, बांधकाम करणे, आवश्यक यंत्रसामग्री आणि साहित्याची व्यवस्था करणे, या सर्व जबाबदाऱ्या एकाच कंत्राटदाराकडे असतील. अशा प्रकारे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते आणि रेल्वे या दोन्ही वाहतुकीसाठी भुयारी मार्ग विकसित केला जाणार आहे.

मात्र, या प्रकल्पात केवळ नदीच्या खालून जाणारा मुख्य टनेलच तयार केला जाणार नाही, तर त्याला जोडणारे भुयारी मार्गही उभारले जाणार आहेत. यामध्ये रस्ते वाहतुकीसाठी १.२६ किलोमीटर, तर रेल्वे वाहतुकीसाठी ४ किलोमीटर लांबीचा जोडमार्ग तयार केला जाईल. हे मार्ग तयार करण्यासाठी ‘कट-अँड-कव्हर’ या बांधकाम पद्धतीचा वापर होणार आहे. आता ही पद्धत नेमकी काय, तर यामध्ये आधी जमिनीचा वरचा भाग खोदला जातो. त्यानंतर त्या खड्ड्यात भुयारी मार्गाचे बांधकाम केले जाते आणि शेवटी तो भाग पुन्हा मातीने झाकला जातो. म्हणजेच, नदीखालच्या मुख्य टनेलला जोडणारे रस्ते आणि रेल्वेचे मार्गही या प्रकल्पात तयार केले जाणार आहेत.

ब्रह्मपुत्रा नदीखालूनच हा टनेल बांधण्याची गरज का भासली?

आसाममधील गोहपूर आणि नुमालीगड ही दोन ठिकाणे ब्रह्मपुत्रा नदीच्या वेगवेगळ्या बाजूंना आहेत. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नदी ओलांडावी लागते. सध्या यासाठी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि बिश्वनाथ शहराच्या परिसरातून सुमारे २४० किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास सहा तास लागतात.

मात्र, प्रस्तावित टनेलमुळे हे चित्र बदलणार आहे. नदीखालून थेट मार्ग उपलब्ध झाल्यामुळे गोहपूर ते नुमालीगड हे अंतर सुमारे ३४ किलोमीटरवर येईल. विशेष म्हणजे, सहा तासांचा प्रवास अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळेत पूर्ण करता येण्याचा अंदाज आहे. म्हणजेच, जवळपास २०६ किलोमीटरचे अंतर आणि साडेपाच तासांहून अधिक वेळ वाचू शकतो.

पण या प्रकल्पाचे महत्त्व केवळ दोन ठिकाणांमधील अंतर कमी करण्यापुरते मर्यादित नाही. हे समजून घेण्यासाठी आसामचे भौगोलिक आणि आर्थिक महत्त्व लक्षात घ्यावे लागेल. आसाम हे ईशान्य भारताचे प्रवेशद्वार मानले जाते. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांच्या दळणवळण व्यवस्थेत आसामची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे आसाममधील वाहतूक व्यवस्था सक्षम झाली, तर त्याचा फायदा संपूर्ण ईशान्य भारताला होऊ शकतो.

टनेलचे आणखी एक वैशिष्ट्य

हा केवळ नदीखालून जाणारा स्वतंत्र रस्ता किंवा रेल्वेमार्ग नसेल, तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या वाहतूक व्यवस्थेला जोडणारा एक मोठा कॉरिडॉर असेल. या कॉरिडॉरची जोडणी दोन राष्ट्रीय महामार्गांबरोबरच दोन विद्यमान रेल्वे मार्गांशी केली जाणार आहे. यामध्ये गोहपूरच्या बाजूला रंगिया-मुकोंगसेलेक रेल्वे मार्ग, तर नुमालीगडच्या बाजूला फरकाटिंग-मरियानी रेल्वे मार्गाशी संपर्क निर्माण होईल. म्हणजेच, नदीच्या एका बाजूचा रस्ते आणि रेल्वे संपर्क दुसऱ्या बाजूच्या वाहतूक व्यवस्थेशी थेट जोडण्याचा हा प्रयत्न आहे.

याशिवाय, या कॉरिडॉरमुळे ११ आर्थिक केंद्रे, ३ सामाजिक केंद्रे, २ पर्यटनस्थळे आणि ८ लॉजिस्टिक केंद्रांना अधिक सक्षम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. इतकेच नाही, तर चार प्रमुख रेल्वे स्थानके, दोन विमानतळ आणि दोन अंतर्गत जलमार्ग टर्मिनलशीही या कॉरिडॉरची जोडणी होणार आहे.

म्हणजेच, रस्ता, रेल्वे, हवाई वाहतूक आणि जलवाहतूक अशा चारही माध्यमांना एकमेकांशी जोडणारी व्यवस्था या प्रकल्पातून तयार होणार आहे. यामुळे प्रवाशांना एका वाहतूक माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे जाणे सोयीचे होईलच, पण मालाची वाहतूकही अधिक सुलभ होऊ शकेल.

कनेक्टिव्हिटीचा आर्थिक फायदा

नुमालीगड औद्योगिक क्षेत्र, जोरहाट, नागाव, शिवसागर आणि इतर औद्योगिक केंद्रांना अधिक वेगवान वाहतूक पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शेतीमाल, कच्चा माल, औद्योगिक उत्पादने आणि बांधकाम साहित्याची ने-आण अधिक वेगाने करता येईल.

सध्या मालाची वाहतूक करताना लागणारा वेळ आणि अंतर कमी झाल्यास इंधन आणि लॉजिस्टिक खर्चातही बचत होऊ शकते. याचा फायदा उद्योग आणि व्यापाऱ्यांना होईल. माल वेळेत बाजारपेठेत पोहोचवणे सोपे होईल आणि नव्या उद्योगांसाठीही या परिसरात संधी निर्माण होऊ शकतात. पर्यायाने, संपूर्ण ईशान्य भारतातील व्यापार आणि औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने प्रकल्प महत्त्वाचा

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि देवपहार पुरातत्त्वीय स्थळासारख्या पर्यटन केंद्रांशी संपर्क अधिक चांगला होण्याची अपेक्षा आहे. प्रवास सोयीचा झाल्यास पर्यटकांना या ठिकाणी पोहोचणे अधिक सुलभ होईल. त्याचा फायदा हॉटेल व्यवसाय, स्थानिक वाहतूक, पर्यटन मार्गदर्शक आणि इतर पूरक व्यवसायांना होऊ शकतो.

रोजगाराच्या दृष्टीने प्रकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

सरकारच्या अंदाजानुसार, प्रकल्पाच्या बांधकामातून सुमारे ८० लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मनुष्य-दिवस रोजगार निर्माण होऊ शकतात. म्हणजेच, बांधकाम क्षेत्रासह वाहतूक, पर्यटन, व्यापार आणि स्थानिक सेवांमध्येही रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पाचे महत्त्व केवळ आर्थिक विकासापुरते मर्यादित नाही, तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही त्याला महत्त्व आहे. अरुणाचल प्रदेशची सीमा चीनला लागून असल्यामुळे ईशान्य भारतातील सीमावर्ती भागांपर्यंत मजबूत रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. अशा पायाभूत सुविधांमुळे आपत्कालीन परिस्थितीत लष्करी वाहने, संरक्षण साहित्य आणि आवश्यक सामग्रीची वाहतूक अधिक सुलभ करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे हा प्रकल्प ईशान्य भारतातील सामरिक कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. थोडक्यात, ब्रह्मपुत्रा नदीखालचा हा टनेल दोन ठिकाणांमधील अंतर कमी करण्यापासून ते संपूर्ण ईशान्य भारतातील वाहतूक, व्यापार, पर्यटन, औद्योगिक विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा अशा अनेक बाबींशी जोडलेला आहे.

एकूणच, ब्रह्मपुत्रा नदीखालून जाणारा हा टनेल म्हणजे केवळ रस्ता आणि रेल्वे जोडणारा प्रकल्प नाही, तर ईशान्य भारताच्या विकासाला गती देणारा महत्त्वाचा दुवा आहे. यामुळे भौगोलिक अंतर कमी होण्यासोबतच व्यापार, उद्योग, पर्यटन आणि सीमावर्ती भागांपर्यंतची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. आज ब्रह्मपुत्रा नदीमुळे दोन भागांमधील प्रवासासाठी मोठा वळसा घालावा लागतो. मात्र, उद्या याच नदीच्या खालून जाणारा मार्ग प्रवासाचा वेळ आणि अंतर दोन्ही कमी करू शकतो. त्यामुळे हा प्रकल्प केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातील एक मोठी कामगिरी ठरणार नाही, तर ईशान्य भारताच्या विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वाचा टप्पाही ठरू शकतो.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा