धर्मगुरू आणि लैंगिक अत्याचारप्रकरणात कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. काही तासांपूर्वीच आसाराम बापूना महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
मात्र, त्यानंतरही आसाराम बापूंची प्रकृती वेगाने खालावत आहे. आसाराम बापूंची ऑक्सिजन पातळी कमी झाली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती नाजूक आहे. त्यामुळे आता आसाराम बापूंना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. ५ मे रोजी त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली.
जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात गेल्या महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला होता. या ठिकाणी जवळपास एक डझन कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या सर्व कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांना तुरुंगातील दवाखान्यात विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
हे ही वाचा:
सोसायटीत लसीकरण करणार, पण कसे?
सत्ताधारी पक्ष ते प्रमुख विरोधी पक्षही नाही, काँग्रेसची अधोगती सुरूच…
मे महिन्याच्या अखेरपर्यंत दुसरी लाट ओसरेल- विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग
मोदी सरकारचा मोठा निर्णय, ८० कोटी नागरिकांना मिळणार मोफत धान्य
यापूर्वी १८ फेब्रुवारीला छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तपासणी केल्यानंतर काहीही गंभीर आढळले नाही. त्यामुळे दोन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा जोधपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. या घटनेवेळी आसाराम बापूंचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जेलच्या बाहेर जमले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.