अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातील मृतांची संख्या २७० वर पोहोचली आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या मृत्युंमुळे या आकडेवारीत वाढ झाली आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. गुरुवारी (१२ जून) दुपारी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे फ्लाइट एआय १७१ हे बीजे मेडिकल हॉस्टेल आणि त्याच्या कॅन्टीन कॉम्प्लेक्सवर कोसळले. या दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला होता.
या विमानात २४२ लोक होते, ज्यामध्ये २३० प्रवासी, दोन वैमानिक आणि १० क्रू मेंबर्सचा समावेश होता. यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला तर एक प्रवासी बचावला. “विमान अपघातस्थळावरून आतापर्यंत सुमारे २७० मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत,” असे बीजे मेडिकल कॉलेजच्या ज्युनियर डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. धवल गमेती यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.
अहमदाबाद अग्निशमन आणि आपत्कालीन सेवाने (AFES) गेल्या २४ तासांत मेघानीनगर परिसरातील विमान अपघातस्थळावरून काही मानवी शरीराचे अवयव तसेच एक मृतदेह ताब्यात घेतला आहे. डीएनए नमुने जुळवून पीडितांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवले जाणार आहेत. अतिरिक्त मुख्य अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया म्हणाले की, विमानाचा मागील भाग कॅन्टीनच्या खराब झालेल्या इमारतीच्या वर अडकला असल्याने, ते खाली आणण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली आहे.
हे ही वाचा :
भारत-पाकिस्तान दरम्यान तिसऱ्या पक्षाची ढवळाढवळ नको
विमान अपघात आणि घटनांचा तपास करणाऱ्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (AAIB) दुर्घटनेच्या २८ तासांनंतर एअर इंडियाच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी शुक्रवारी दिली. त्यानुसार अपघाताची माहिती लवकरच उघड होईल.