29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषदख्खनेत कसा आला हिंदूद्वेष्टा औरंगजेब (भाग २)

दख्खनेत कसा आला हिंदूद्वेष्टा औरंगजेब (भाग २)

आलमगीर गाझी महंमद मोहिउद्दिन औरंगजेब' हा मराठ्यांच्या इतिहासातला एक अटळ भाग आहे. मराठ्यांच्या तीन पिढ्या ज्याच्याशी झुंजण्यात गेल्या; मराठ्यांचे तीन छत्रपती ज्याने पाहिले असा दीर्घायुषी बादशहा औरंगजेब! मुघल साम्राज्याला कळसापर्यंत नेण्याचं काम औरंगजेबाने केलं; मात्र त्याच्याच हयातीत हे साम्राज्य उताराला देखील लागलं. त्याचं दीर्घायुष्य ज्या मुघलांसाठी वरदान होतं तेच पुढे शाप ठरलं. दक्षिणेमध्ये उतरताना मराठ्यांचे साम्राज्य बुडवण्याचा हेतूने उतरलेला औरंगजेब स्वतः अहमदनगर जवळ भिंगार येथे मृत्यू पावला. मराठ्यांशी लढण्याकरिता दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतूबशाही या कित्येक शतके चालत आलेल्या बादशाह्या देखील संपवल्या मात्र मराठ्यांच्या मुलुखाला धक्का लावणं त्याला काही जमलं नाही. शेवटी अहमदनगर जवळील भिंगार येथे त्याचा मृत्यू झाला. मराठ्यांनी कोणाशी नेमकी झुंज घेतली? तो शत्रू कसा होता? काय होता? त्याचं राजकारण कसं आहे? त्याचं सैन्य किती होतं? या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या पूर्वजांचं कर्तृत्व अधिकच स्पष्ट होतं. त्यासाठी औरंगजेबाच्या एकंदरीत आयुष्याचा हा थोडक्यात घेतलेला आढावा आहे. मागील भागात औरंगजेब गुजरातचा सुभेदार होतो इथपर्यंतचा कार्यकाळ पाहिला. आता पुढे...

Google News Follow

Related

गुजरातमध्ये आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच औरंगजेबाने अहमदाबाद जवळील सरसपूर येथील एका जैन मंदिराला उध्वस्त केले. पार्श्वनाथांना समर्पित असलेले हे जैन मंदिर अत्यंत सुरेख असून जैन व्यापारी शांतीदास याने ते बांधले होते अशी नोंद एका जर्मन प्रवाशाने करून ठेवली आहे. औरंगजेबाने तेथील सर्व मुर्त्यांची नाके फोडून मूर्ती विद्रुप करण्याची आज्ञा दिली. मग मंदिरातच गाय मारून त्या मंदिराचे पावित्र्य भंग केले आणि अखेर ते मंदिर पाडून तिथे मशीद उभी करण्याचे आदेश दिले. वास्तविक यामुळे त्याने अप्रत्यक्षपणे शहाजहानला डिवचले होते कारण शांतीदास  हा त्या भागातील अत्यंत श्रीमंत व्यापारी होता आणि शहाजहानशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. शहाजहानने याबाबत कानउघडणी करणारे पत्र पाठवल्यावर उत्तरादाखल औरंगजेबाने “तुम्ही देखील बनारसच्या मंदिरांवर असाच घाला घातला होता!” असा आरसा दाखवणारे उलट पत्र पाठविले. मात्र आपले आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी शहाजहानने शांतिदासाला दिलगिरी व्यक्त करणारे पत्र पाठविले. त्यामुळे त्या मंदिराचे मशिदीत रूपांतर होता होता वाचले.

मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा- आलमगीर औरंगजेब: मराठे ज्याला पुरून उरले

१६४७ मध्ये औरंगजेबाला बाल्ख मोहीमेवरती पाठवण्यात आले. खरंतर १६४३ मध्ये शहाजहानने मुरादला बाल्ख प्रदेशात पाठवले. बाबर हा बाल्ख जवळच्या प्रदेशातला – समरकंदच्या प्रदेशातला. आपण समरकंद जिंकावे ही शहाजहानची महत्वाकांक्षा होती. त्याला “मुळ” जागा म्हणून भावनिक बाजूही होती. परंतु मुरादने रानटी टोळ्या आणि थंडीपुढे जास्तकाळ टिकाव लागणार नाही म्हणून माघार घेतली होती. त्यामुळे मुरादने जिंकलेला सगळा प्रदेश टोळीवाल्यांनी पुन्हा हस्तगत केला. आता औरंगजेबाची पाळी होती. अजीजखानच्या हाताखाली उझबेगी टोळ्या लढत होत्या. बाल्खकडे माघार घेताना ऐन युद्धात नमाजाची वेळ झाली म्हणून भर रणांगणावरती चिलखत वगैरे न घालताच औरंगजेबाने चादर पसरुन नमाज पढायला सुरुवात केली. अजीजखानने दूरुन हे बघितले व उद्गारला – “ह्या माणसाशी वैर घेणे म्हणजे सर्वनाश ओढावून घेणे आहे!” पुढे उझबेगी व औरंगजेब यांच्यात तह झाला. मुघलांच्या हातात फार काही पडले नाही. शाही खजिन्याला चौदा कोटींचा खड्डा तितका पडला. १६४९ मध्ये औरंगजेबाने कंदहारच्या किल्याजवळ भीषण दीर्घकालीन युद्धाचा अनुभव घेतला. जबरदस्त ताकदीच्या पर्शियन तोफखान्याने मुघलांची रेवडी उडवली. चार हजार मोगल सैनिक कामास आले. सहा हजार मालवाहु जनावरे मेली. दुष्काळाने फार हाल केले. १६५२ साली पुन्हा कंदाहार जिंकून घेण्यासाठी औरंगजेबाला मोहिमेवर पाठविले. त्याच्यासोबत शुजाने जावे अशी शहाजहानची इच्छा होती पण गंमत म्हणजे हे दोघं एकत्र झाले तर बंड करतील अशी दाराला भीती होती व कंदाहार जिंकल्यास आपल्या यशात शुजाला वाटेकरी करावे लागेल अशी औरंगजेबाला भीती वाटत होती. मात्र वाटेतच शुजा महिनाभर आजारी पडला व पुढे गेला नाही.  जो मुघली तोफखाना इतर भारतीय सत्तांच्या पोटात गोळा आणत असे तो पर्शियन तोफखान्याच्या आसपास देखिल पोहोचत नसे इतका पर्शियन तोफखाना ताकदीचा होता हे आपण लक्षात घ्यायला हवे. कंदहारच्या किल्यासाठी पर्शियन आणि मुघल दोघे इरेस पडले. तब्बल दिडशे मुघली तोफा कंदहारच्या किल्यावरती आग ओकु लागल्या. प्रत्येकितून दिवसभरातून दहा – बारा तोफगोळे किल्यावर डागले जात. म्हणजे रोज दिड हजार तोफगोळे कंदहारचा किल्ला झेलत होता. पण पर्शियनही तिथुन दणदणीत उत्तर देत होते. शिवाय झालेले नुकसान रात्री तट बुझवुन काढत असत. दिड महिना हा तमाशा बघून शहाजहानने सैन्य मागे बोलावले. औरंगजेबाला हा अपमान झोंबला. ५ वर्षात खर्च अफाट यश जेमतेम अश्या तीन अनुभवांतुन औरंगजेब गेला. कंदहारच्या मोहिमेत दिड महीन्यात दोन कोटिंचा चुराडा झाला.

कंदहार मधील अपयशामुळे शहाजहान आणि औरंगजेबातले संबंध पुन्हा बिघडले. औरंगजेबाची रवानगी दख्खनला झाली. दोघांत कडवटपणा आला, तो त्यांच्या पत्रातही दिसून येतो. इतक्या तयारीनंतरही कंदहारचा किल्ला जिंकू न शकल्याबद्दल शहाजहानने आश्चर्य व्यक्त केले. शिवाय कंदहारवरती मी नक्कीच पुन्हा आक्रमण करीन असे सांगितले. उत्तरादाखल औरंगजेबाने आपण पूर्ण प्रयत्न केले परंतु तोफखाना अपुरा पडल्याने आपल्याला अपयश आल्याचे कारण पुढे केले. शिवाय पुढल्या मोहीमेत मला सोबत घ्या अशी विनंती केली. त्यावरती शहाजहानने उत्तर पाठवले – “तू कंदहार घेऊ शकतोस असा विश्वास असता तर तुला मागे बोलावलेच नसते. प्रत्येक माणसाची एक कुवत असते.” औरंगजेबाने हताशपणे उलट जबाब पाठवला “स्वत:चे हीत कशात आहे हे प्रत्येकाला समजते. कंदहारच्या अपयशाने तुम्ही माझ्यावरती नाराज होणार हे माहीत असताना मी काही जाणूनबुजून अपयश घेऊन आलेलो नाही.” ही वेळ नाजूक होती. शहाजहानने साठी ओलांडली होती. कंदहार जिंकण्याने कर्तृत्व आपोआप सिद्ध होऊन सत्तेचा सोपान औरंगजेबाला सोपा गेला असता. म्हणून कंदहार मोहीमेत आपण येऊ इच्छितो असे त्याने कळावले होते पण शहाजहानने त्याला दख्खनेत पाठवले आणि दाराला चार कोटिंचा खर्च करुन कंदहार मोहीमेवरती; पण दाराही हात हलवत परत आला.

औरंगजेब दख्खनमध्ये आला खरा पण दख्खनचा सुभा त्याच्या आधीच्या सिंध सुभ्यापेक्षा सतरा लाखाने कमी होता. औरंगजेब हे वरचे सतरा लाख मागु लागला पण शहाजहानने त्याला नकार दिला. दख्खनचा सुभा फक्त कागदापुरता तीन कोटींचा होता पण प्रत्यक्षात एक – सव्वा कोटिंपेक्षा जास्त महसूल मिळत नव्हता. त्या उत्पन्नात अधिकारी व सैन्याचे पगार देणे व शिलकी ठेवणे म्हणजे तारेवरची कसरत होती. दख्खनमध्ये आल्यापासून औरंगजेबाची आर्थिक परीस्थिती जेमतेम होती. वरतून शहजहानने काही महीने औरंगजेबाचा जनाना आग्र्यात अडकवून ठेवला होता. नंतर तो सोडला तरी ह्या सगळ्या मागे दाराचा हात असण्याची शक्यता होतीच. नोव्हेंबर १६५३ मध्ये तो दख्खनमध्ये पोहोचला. देवगिरीचा दौलताबाद झालाच होता,  शहाजहानने पहिल्या खेपेसच जवळच्या “खडकीचे” नाव बदलुन “औरंगाबाद” केलेच होते. औरंगजेब अखेर औरंगाबादला पोहोचला. त्याने दख्खन सुभ्याची ओढगस्तीला लागलेली अवस्था बघितली आणि धडाक्याने कारभारास सुरुवात केली. त्याने मुर्शीद कुलीखानला हाताशी घेतले. सुभ्याची महसूल आकारणीची पद्धत बदलली. ऊपजाऊ जमीनीच्या प्रतीनुसार शेतसारा सुरु केला. नवीन गावकुसं बसवायला सुरुवात केली. अनेकांना त्याने कामातली हयगय बघून बडतर्फ केले. जुने तोपची आणि तोफा काढून टाकल्या. अनेकांच्या अवास्तव जहागिरी जप्त केला व सरकार जमा करुन उत्पन्न वाढवायचा प्रयत्न केला. १६५३ ते १६५५ ह्या दोन वर्षात त्याने दख्खनचा महसूल एक कोटी रुपयांवरुन दोन कोटींच्याहीवर नेला. या काळातील आठवणी पुढे त्याने आपल्या नातवाला – बेदारबख्त याला लिहीलेल्या पत्रात औरंगजेब लिहितो – “औरंगाबादजवळ सातारा नावाचे लहान गाव होते शिकारी निमित्त तिथे गेले असताना समोरील टेकडीवरती असलेले खंडोबाचे मंदिर मी पाडून टाकले होते” असे तो लिहीतो. कतलक तळ्या जवळिल मुक्काम, बुर्हाणुद्दीन आणि जैनुद्दीन या अवलियांचे दर्शन याबाबतही त्याने लिहिले आहे. या काळातील एक पत्र औरंगजेबाच्या प्रवृत्तीवरती प्रकाश टाकते. हे पत्र त्याने सादुल्लाखानस पत्र लिहीले आहे  “छबिलराम नामक ब्राह्मणाने पैगंबरांविषयी वाईट शब्द उच्चारले. त्याची चौकशी करुन जुल्फिकारखानाने त्याचे डोके मारले. त्याच्या भावांनी बादशहाकडे अपील केले आहे असे समजते. छबिलराम काफराला मी कुराणाप्रमाणेच शिक्षा दिली आहे. मुसलमानी तत्वाचा पुरस्कार प्रत्येक मुसलमानांनी करायलाच हवा. छबिलरामच्या भावांची तक्रार बादशहांपर्यंत पोहोचणार नाही ह्याची काळजी घे!” अर्थात ज्या मनसबदारांच्या मनसबी त्याने जप्त केल्या त्यांच्या तक्रारी शहाजहानपर्यंत पोहोचतच होत्या. बाप – बेट्यांच्या नात्यातला संघर्ष वाढत चालला होता.

१६५५ – ५६ मध्ये दख्खनेत एक फार मोठे राजकारण आणि युद्ध औरंगजेब खेळला – मीर जुम्ला प्रकरण. वास्तविक मीर जुम्ला प्रकरण हा खरोखर एका वेगळा विषय व्हावा इतके मोठे आणि दख्खनला गदागदा हलवणारे राजकारण होते. मीर जुम्लाचे मुळ नाव महंमद सैद, हा पर्शियातील अर्दिस्तानचा. १६३० मध्ये व्यापारा निमित्त गोवळकोंड्यापर्यंत पोहोचला. हिर्‍यांच्या व्यापारात त्याने जम बसवला. तो अब्दुल्ला कुत्बशहा व त्याची आई बेगम हयातबख्शबेगम यांच्य मर्जीतला माणूस बनला व बघता बघता कुतुबशहाचा वजीर बनला. कुतुबशहाने त्याला मीर जुम्ला अशी पदवी दिली. मीर जुम्ल्याने तोफा ओतायचे कारखाने सुरु केले. अनेक युरोपियन गोलंदाज नेमले. कडप्पा जिल्हा जिंकून घेतला. अनेक देवस्थाने लुटून प्रचंड पैसा जमा केला. त्याचा मुलगा महंमद अमीन आता मीर जुम्ल्याचा मुतालिक म्हणून हैदरबादमध्ये कारभार बघू लागला. पण अमीन अट्टल दारुडा होता. त्याने दारुच्या नशेत दरबारात येऊन गोंधळ घातला. इतकेच नव्हे तर बादशहाचीच बिछायत खराब केली. अर्थात अमीन व हैदराबाद मधील त्याच्या सर्व कुटुंबाला अटकेत टाकले. औरंगजेबाचे या घटनांवरती बारिक लक्ष होते. त्याने नांदेडजवळ आपले सैन्य जमवले. मीर जुम्ल्याशी संधान साधून त्याला मुघल दरबारातील वजीरीचे आश्वासन दिले. शहाजहनला गुप्त पत्रे पाठवून सगळे राजकारण समजावले. शहाजहानने ताबडतोब मीर जुम्ला व अमीनला मोगली मनसबदारी दिली आणि अमीन आमचा मनसबदार असल्याने त्याची सुटका करा असे फर्मान पाठवले. कुत्बशहा नमला नाही. अखेर १० जानेवारी १६५६ मध्ये औरंगजेबाच्या मुलाने महंमद सुलतानने नांदेडवरुन हैदराबादच्या दिशेने कूच केले. तो हैदराबादच्या जवळ पोहोचला. कुत्बशहाने अमीनखानची सुटक केली, आणि युद्ध थांबविण्याची विनंती केली. पण अमीनखानची मालमत्ता परत दिली नाही म्हणून औरंगजेबाने युद्ध सुरु ठेवले. कुत्बशहा गोवळकोंडा किल्याच्या आश्रयाला गेला. औरंगजेबाने आपल्या मुलाला कुत्बशहाची भेट घ्यायला सांगितले -“कुत्बशहाच्या मानेवरील त्याच्या मस्तकाचा भार कमी कर. त्यासाठी हुषारी, चलाखपणा आणि हाताचा हलकेपणा वापर!”. अर्थात कुत्बशहाने औरंगजेबाच्या निरोपाला नकार दिल्याने त्याचा जीव वाचला.

२५ जानेवारी १६५६ रोजी महंमद सुलतान हैदराबादमधील हुसेन सागर तलावाजवळ पोहोचला. त्याने हैदराबाद लुटायला सुरुवात केली. पाठोपाठ औरंगजेब ६ फेब्रुवारीला हैदराबादला पोहोचला. पण गोवळकोंड्याला वेढा घालता येईल इतके सैन्य त्याच्याकडे नव्हते. त्याने शहाजहानकडून अधिक कूमक मागवली. कुत्बशहाने दाराशी संधान बांधून शहाजहानकडे तहाची मागणी केली. दाराने शहाजहानचे जान फुंकले. शहाजहानने सैन्य मागे घेण्यास सांगितले. पण औरंगजेबाने त्याकडे लक्ष दिले नाही. शहाजहानला या दरम्यान लिहीलेल्या एका पत्रात औरंगजेब हैदराबादच्या परीसराचे वर्णन करतो – “इथल्या सृष्टीसौंदर्याबाबत काय आणि किती लिहू? मला जागोजागी मोठे तलाव,  गोड्या पाण्याचे झरे, भरपूर शेते, दिसत आहेत. असा समृद्ध प्रदेश त्या नादानांच्या हाती पडलाय तो आपण जिंकून घ्यायला हवा.” २० मार्चला मीर जुम्ला देखिल औरंगजेबाला येऊन मिळाला. आता औरंगजेबाला नवे बळ मिळालेच होते तोवर कुत्बशहाने अजून एक पत्र दिल्लीत शहाजनहानला पाठवल्यावर शहाजहानने पहील्या शाही फर्मानाचे पालन न केल्या बद्दल औरंगजेबाची कडक शब्दांत कान उघडणी केली. दुसर्‍या फर्मानाने औरंगजेबाला नाईलाजाने माघार घ्यावी लागली. औरंगजेबाने कुत्बशहाकडे शरण आलास तर युद्ध थांबेल असा निरोप पाठवला. या दमदाटीत फार अर्थ नाही हे कुत्बशहाला कळून चुकले होते. अब्दुल्ला कुत्बशहाची आई हयातबख्शबेगम येऊन औरंगजेबाला भेटली. १ कोटी रुपये खंडणी, रामगीर जिल्हा मुघलांना द्यावा. आणि कुत्बशहाच्या एका मुलीचे लग्न औरंगजेबाचा मुलगा सुलतान महंमद याच्याबरोबर करावे असे ठरले. ३० मार्चला अखेर औरंगजेब माघरी फिरला. त्याच्या सोबत मीर जुम्ला होता.

औरंगजेब बुर्‍हाणपुरला पोहोचला तसा शहाजहानने निरोप पाठवून मीर जुम्ला याला दिल्लीस बोलावून घेतले. ७ जुलै १६५६ रोजी तो दिल्लीत पोहोचला. त्याने शहाजहानला तब्बल १५ लाख रुपयांचा नजराणा दिला. एक मोठा हिरा नजर केला. शहाजहानने मीर जुम्ल्याला सहा हजारी मनसब दिली आणि मरण पावलेल्या सादुल्लाखानच्या जागी वजीर म्हणून नेमणूक केली. दारासाठी हा शह होता. वजीरीवरती औरंगजेबाचा पक्षपाती मीर जुम्ला आला होत. शहाजहान मोठ्या हुशारीने दोन्ही मुलांना आटोक्यात ठेवत होता. कुतुबशहाच्या वकीलाने दिल्ली दरबारात नवी तक्रार केली. एक कोट खंडणीतून हैदराबाद शहराची केलेली लूट वजा करावी. शहाजहानला असे वाटत होते की औरंगजेबाने मिळालेल्या लुटीचा योग्य तो हिशोब दिलेला नाही. पुन्हा पत्रातून गरमागरमी झाली. उलट औरंगजेबाचे म्हणणे असे होते की “मिळालेली सारी लुट सरकारी खजिन्यातच गेली व उलट त्यातून जो न्याय्य वाटा मला मिळायला हवा तोच मिळालेला नाही. तुमचे कान दरबारातील दुष्ट मंडळी भरत आहेत.” हे सुरु असतानाच दख्खनमध्ये दोन महत्वाच्या घटना घडल्या जानेवारी १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली. अर्थात ही घटना म्हणजे मुघलांसाठी आदिलशाही प्रांतातील एका स्थानिक जहागिरदाराची पुंडाई इतकेच महत्व होते. दुसरी घटना म्हणजे ४ नोव्हेंबर रोजी वृद्ध महंमद आदिलशहा आजारी पडला आणि वारला. त्याच्या जागी त्याचा १८ वर्षांचा दासीपुत्र आला. औरंगजेबाला आपली खुमखुमी बाहेर काढायला एक कोलित मिळाले. नवीन सुलतान हा औरस वारस नसल्याने आदिलशाही बरखास्त करण्याची परवानगी त्याने शहाजहानकडे मागितली. शहाजहानने ही परवानगी तर दिलीच पण मीर जुम्ल्यास वजीरीवरुन काढून पुन्हा दख्खनेत पाठवले. दख्खनेत वर्षभरातच युद्धाचे ढग जमु लागले.

(क्रमशः)

संदर्भ –

१) हिस्टरी ऑफ औरंगजेब- सर जदुनाथ सरकार

२) द एम्परर हू नेव्हर वॉज- सुप्रिया गांधी

३) सिंध इन मुघल एम्पायर- अमित पालीवाल

४) मुसलमानी  रियासत भाग २ – रियासतकार सरदेसाई

५) स्टोरिया डो मोगोर- निकोलाओ मनुची

६) औरंगजेब: शक्यता आणि शोकांतिका- रवींद्र गोडबोले

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा