व्हेनेझुएला भूकंपानंतर आठ दिवस ढिगाऱ्याखाली… अखेर चमत्कार!

बचाव पथकाची थरारक मोहीम यशस्वी

व्हेनेझुएला भूकंपानंतर आठ दिवस ढिगाऱ्याखाली… अखेर चमत्कार!

व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण दुहेरी भूकंपानंतर तब्बल आठ दिवस ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका सुरक्षा रक्षकाची अखेर सुखरूप सुटका करण्यात बचाव पथकाला यश आले. हर्नान अल्बर्टो गिल फ्लोरेस (वय ४३) यांची सुटका झाल्यानंतर बचाव पथकातील सदस्यांनी जल्लोष केला, तर त्यांच्या कुटुंबीयांनी याला “चमत्कार” असे संबोधले आहे. २४ जून रोजी व्हेनेझुएलाच्या उत्तर किनारपट्टीला ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे सलग दोन शक्तिशाली भूकंप झाले होते. या भूकंपात ला ग्वायरा प्रांतातील गॅलेरियास प्लाया ग्रांदे शॉपिंग सेंटर कोसळले. त्यावेळी तेथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले हर्नान गिल फ्लोरेस तळघरातील सुरक्षा कक्षात अडकले होते.

हर्नान जिवंत असल्याचा शोध लागल्यानंतर बचाव पथकाने सलग तीन दिवस रात्रंदिवस मोहीम राबवली. ढिगाऱ्याखाली त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद बोगदे खोदण्यात आले. दुर्बिणीच्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. एका नळीद्वारे त्यांना पाणी, अन्न आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला, ज्यामुळे ते जिवंत राहू शकले.

या बचाव मोहिमेत व्हेनेझुएलासह चिली, कोस्टारिका, अमेरिका, पोर्तुगाल, मेक्सिको आणि एल साल्वाडोर येथील बचाव पथकांनी सहभाग घेतला. ढिगाऱ्याची अस्थिर रचना, सततचे आफ्टरशॉक्स आणि पावसामुळे ही मोहीम अत्यंत कठीण ठरली. तरीही शेकडो तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हर्नान यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. हर्नान यांच्या पत्नी गुस्बिमार गोंझालेझ यांनी त्यांच्या सुटकेनंतर भावना व्यक्त करत, “इतक्या देशांनी एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी एकत्र येण्याचा प्रसंग मी प्रथमच पाहिला. हा खरोखरच चमत्कार आहे,” असे सांगितले. त्यांच्या मते, हर्नान यांना गंभीर दुखापत झाली नसून ते ढिगाऱ्याखाली टेबल आणि खुर्चीच्या आडोशाला असल्याने त्यांचा जीव वाचला.

हे ही वाचा:

इराणच्या वरिष्ठ नेत्यांच्या हत्येचा इस्रायलचा कट?

“काश्मिरींना बंदुका पाक लष्कराने दिल्या आणि आता दहशतवादी म्हणतात”

मोजतबा खामेनी वडिलांच्या अंत्यविधीला राहणार गैरहजर

भारत-जपानमध्ये संयुक्त संरक्षण सह-विकास प्रकल्प करार

दरम्यान, व्हेनेझुएलातील या भूकंपात आतापर्यंत २,२०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ११ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. हजारो इमारतींचे नुकसान झाले असून अनेक नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव आणि शोधमोहीम अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली आणखी काही जण जिवंत सापडण्याची आशा बचाव पथकांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version