उत्तराखंडमधील गाजलेल्या अंकिता भंडारी हत्याकांडात दोषी ठरवण्यात आलेल्या तिघांही आरोपींना शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ही शिक्षा कोटद्वार येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे. या हत्याकांडात मुख्य आरोपी पुलकित आर्य आणि त्याचे दोन कर्मचारी सौरभ भास्कर व अंकित गुप्ता यांना भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ (खून), २०१ (पुरावे नष्ट करणे), आणि ३५४ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.
मुख्य आरोपी पुलकित आर्यवर ३०२, २०१, ३५४ए आणि अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये आरोप सिद्ध झाले आहेत. तर सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांना ३०२, २०१ आणि अनैतिक देह व्यापार कायद्यांतर्गत दोषी ठरवले गेले.
या प्रकरणाची दोन वर्षे आठ महिन्यांपर्यंत सुनावणी झाली. यामध्ये न्यायालयात एकूण ४७ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. १९ मे रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती आणि नंतर ३० मे रोजी शिक्षा सुनावली जाईल असे जाहीर करण्यात आले होते.
घरची आर्थिक स्थिती हालाखीची असल्यामुळे अंकिता भंडारीने रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी स्वीकारली होती. पण नोकरीला लागल्यानंतर अवघ्या २० दिवसांत ती बेपत्ता झाली. तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यांमध्ये तिच्या बेपत्ताची तक्रार दाखल करण्यासाठी पौडी, मुनिकीरेती आणि ऋषिकेशचा धावपळ केली, पण कुठेही ऐकून घेतले गेले नाही.
नंतर जनतेचा दबाव वाढल्यावर हे प्रकरण पोलिसांकडे सोपवले गेले आणि पुलकित आर्यसह त्याचे दोन सहकारी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांना अटक करण्यात आली.
२४ सप्टेंबर २०२२ रोजी चीला नदीतून अंकिता भंडारीचा मृतदेह सापडला. या घटनेने संपूर्ण उत्तराखंड हादरून गेला होता. लोक रस्त्यावर उतरले, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आणि पोलिसांच्या ढिसाळ कारभारावर रोष व्यक्त केला.
