इथिओपियाच्या हेली गुब्बी ज्वालामुखीतून निघणाऱ्या राखेचा परिणाम हा थेट भारतातील अनेक शहरांवर झाला आहे. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास राख दिल्ली- एनसीआरमध्ये पोहोचली. हवामान विभाग या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. रविवारी (२३ नोव्हेंबर) दीर्घकाळ निष्क्रिय असलेल्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर ही घटना घडली. १०,००० वर्षांत पहिल्यांदाच ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. यामुळे राख आणि सल्फर डायऑक्साइडचा मोठा थर आकाशात पसरला आहे. जवळजवळ ४,००० किलोमीटर ही राख वाऱ्याच्या जोरदार प्रवाहासोबत भारताकडे आली.
हवामान अंदाज अधिकारी एका दिवसापासून या घटनेचा मागोवा घेत होते कारण ते लाल समुद्र ओलांडून वायव्य भारताकडे सुमारे १३० किमी प्रतितास वेगाने जात होते. गेल्या १०,००० वर्षांत पहिल्यांदाच रविवारी दीर्घकाळ निष्क्रिय असलेल्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. राख आणि सल्फर डायऑक्साइडचा जाड थर आकाशात उडाला. हवामान खात्याच्या माहितीनुसार, हे वादळ पहिले पश्चिम राजस्थानमधून भारतात दाखल झाले. “राखेचे ढग जोधपूर- जैसलमेर प्रदेशातून भारतीय उपखंडात दाखल झाले आणि १२०- १३० किमी प्रतितास वेगाने ईशान्येकडे सरकत आहेत,” असे इंडिया मेट स्काय वेदर अलर्टमध्ये म्हटले आहे. राख २५,००० ते ४५,००० फूट उंचीवर असल्याने काळजी करण्यासारखे काही नसल्याचे म्हटले आहे.
विमान कंपन्यांना यासंबंधी अलर्ट पाठवण्यात आला आहे. तसेच त्यांना मार्ग आणि इंधन योजनांमध्ये सुधारणा करण्यास सांगितले असून राखेने प्रभावित झालेल्या कोणत्याही हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्यापासून सावध करण्यात आले आहे. तसेच वैमानिकांना कोणत्याही असामान्य इंजिन वर्तनाची किंवा केबिनच्या वासाची त्वरित तक्रार करण्यास सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेला अटक
“सिंध भारतात परत येऊ शकतो, सीमा बदलू शकतात”
दिल्लीत प्रदूषणाविरुद्धच्या आंदोलनात माओवादी कमांडर माडवी हिडमाचे पोस्टर्स
केएल राहुल वनडेसाठी कर्णधार, जडेजा–ऋतुराजचे पुनरागमन
सोमवारी ज्वालामुखीच्या राखेचा कॉरिडॉर ओलांडणाऱ्या मार्गांवरील विमान उड्डाणांमध्ये व्यत्यय आला. पीटीआय वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, इथिओपियातील ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर खबरदारी म्हणून कोचीहून दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने सांगितले की, इंडिगोची कोचीन-दुबई सेवा (6E1475) आणि अकासा एअरची कोचीन-जेद्दाह सेवा (QP550) प्रभावित झालेल्या उड्डाणांमध्ये आहेत. परिस्थिती सुधारल्यानंतर विमान सेवा पुन्हा सुरू करण्यात येतील असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. राखेच्या ढगांमुळे केएलएम रॉयल डच एअरलाइन्सने त्यांची अॅमस्टरडॅम-दिल्ली फ्लाइट (केएल ८७१) आणि परतीची दिल्ली-अॅमस्टरडॅम सेवा (केएल ८७२) रद्द केली.







