बलोच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्याची इतकी वाईट अवस्था केली की संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ स्वत: सांगयातय की, ‘आमचे सैन्य पंगू झाले आहे. बलोच बंडखोरांच्या हाती अमेरिकन शस्त्रे आहेत. आमचे सैन्य त्यांचा मुकाबला करू शकत नाहीत.’ बलोच बंडखोरांच्या हाती असलेली ही शस्त्र अमेरिकेने त्यांना दिलेली नाही. प्रत्यक्ष दिली नसली तरी अप्रत्यक्षरित्या अमेरिकाच याला कारणीभूत आहे. याच शस्त्रांच्या बळावर चीन पाकिस्तान इकोनॉमिक कोरीडोअरची मानगुट तीन दिवस बीएलएच्या हाती होती.
पाकिस्तानच्या नॅशनल एसेम्ब्लीमध्ये संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी जाहीर कबुली दिलेली आहे की, बलोच बंडखोरांचे आव्हान आमच्या सैन्याला पेलवत नाही. ख्वाजा आसिफ असे म्हणाले नसते तरी जगाला ते दिसते आहे. बलोच बंडखोरांचा हल्ला झाली की मार खाणे आणि पळणे एवढेच आता पाकिस्तानी सैन्याच्या हाती उरले आहे. बलोचिस्तानची एकूण लोक संख्या जेमतेम दीड कोटी आहे. त्यातले मूठभर बंडखोर आहेत. त्यातुलनेत अनेक पट संख्या असलेल्या पाकिस्तानी सैन्याला त्यांना आवरता येत नाही. बलोच बंडखोरांचे हल्ले रोखता येत नाहीत.
मार्च २०२५ मध्ये बीएलए आत्मघाती शाखा असलेल्या माजिद ब्रिगेडच्या बंडखोरांनी बलोचिस्तानमधून जाणारी जाफर एक्सप्रेस हायजॅक केली होती. जगाच्या इतिहासात बंडखोरांनी एखादी रेल्वे हायजॅक करण्याची ही बहुधा पहीली वेळ असावी. ३१ जानेवारी रोजी बीएलएने पाकिस्तानमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले केले. चीन पाकिस्तान इकोनॉमिक कोरीडोअरचा महत्वाचा टप्पा असलेले नुश्की तीन दिवस बंडखोरांच्या ताब्यात होते. सगळ्या चौक्या सोडून पाक सैन्य पळाले. तीन दिवसांनंतर हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने नुश्की त्यांना परत मिळवावे लागले.
बंडखोरांच्या समोर पाकिस्तानने कसे हात टेकले आहेत, त्याची कबूली ख्वाजा आसिफ यांनी दिली. बंडखोरांच्या हाती असलेल्या अमेरिकी शस्त्रांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. एकेका बंडखोराकडे सुमारे २० हजार डॉलर किमतीची मिलिटरी गिअऱ असतात. यात एम-४ आणि एम१६ रायफल, स्नायपर्स, थर्मल स्कोप्स, नाईट व्हिजन गॉगल, कम्युनिकेशनसह अन्य उपकरणांचा समावेश आहे.
या अमेरिकी शस्त्रांनी पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. जाफर एक्सप्रेस हायजॅकनंतर वॉशिग्टन पोस्टमध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात म्हटले होते की बलोच बंडखोरांकडे अमेरिकी शस्त्र आहेत. अशी शस्त्रे जी पाकिस्तानच्या लष्कराकडेही नाहीत. २०२१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातून पळ काढला. जाताना तिथे सोडलेली शस्त्र ८५ अब्ज डॉलरची होती. त्यापैकी सुमारे ५ लाख शस्त्र गायब आहेत. अफगाणिस्तान हा जगातील मोठा शस्त्र विक्रेता बनला असून त्याचे कारण सगळ्याना ठाऊक आहे, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. हे सत्य आहे कारण, महागडी अमेरिकी शस्त्र अफगाणिस्तानच्या रस्त्यावर विकली जात आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परीषदेच्या दोहामध्ये झालेल्या बैठकीत अमेरिकेची सुमारे ५ लाख शस्त्रे गायब झाल्याची कबूली तालिबान प्रतिनिधींनी दिली होती. ही शस्त्रे बीएलए आणि तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या बंडखोर गटांच्या हाती लागलेली आहेत. याच शस्त्रांमुळे बीएलए आणि टीटीपीचे बंडखोर पाकिस्तानी सैन्याला भारी पडत आहेत.
चीन पाकिस्तान कोरीडोअरच्या मुद्द्यावरून काही महिन्यांपूर्वी भारत आणि चीनमध्य शाब्दीक वाद झडला होता.
चायना पाकिस्तान इकोनॉमिक कोरीडोअर हा बेल्ट एण्ड रोड प्रकल्पाचा अत्यंत महत्वाचा हिस्सा असल्याचे विधान चीनकडून आल्यानंतर जून २०२५ मध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितले की, सीपेक प्रकल्प हा भारताच्या सार्वभौमत्वाचा भंग आहे, कारण हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. इथे कोणत्याही प्रकारचे आर्थिक सामरीक उपक्रम भारताला मान्य नाहीत. ऑगस्ट २०२५ मध्ये चीनी सरकारी माध्यमांनी सीपेकमध्ये चीनचे सामरीक हित गुंतले असल्याचा दावा केला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा याचा समाचार घेतला. चीनचे हे दावे भारत मान्य करणार नाही, असे पुन्हा ठणकावले.
हे ही वाचा:
मोदीची कब्र तुम्ही खोदू शकणार नाही; माझ्याकडे आहे, जनतेच्या आशीर्वादाचे कवच
“भारत बनला आहे दक्षिण जगताचा आवाज”
तिरुवनंतपुरमच्या भाजप नगरसेवकांसाठी पंतप्रधान मोदींकडून ‘मेजवानी’
पादचाऱ्यांवर मूत्राने भरलेली बाटली फेकणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
याचा अर्थ उघड आहे, सीपेक पाकिस्तानातून जात असला तरी यावर अप्रत्यक्ष नियंत्रण चीनचे आहे किंवा ते निर्माण करण्याचा चीनचा प्रय़त्न दिसतो. हा प्रयत्न भारताला जसा मान्य नाही, तसा तो बलोच बंडखोरांनाही मंजूर होणे शक्य नाही. कारण सीपेकचा एक मोठा भाग बलोचिस्तानमधून जातो. चीनचा इतिहास जगाला ठाऊक आहे की चीनला पायाभूत सुविधा केवळ आणि केवळ संसाधनांची लूट करण्यासाठी हव्या असतात. बीएलचा या लुटीला विरोध आहे. त्यामुळे ३१ जानेवारी रोजी बीएलएने केलेले हल्ले हा फक्त पाकिस्तानला दणका नसून चीनलाही आहे.
कारण या हल्ल्यात सीपेक सुद्धा रडारवर होता. नुश्कीवर झालेल्या हल्ल्यातून हे बऱ्यापैकी उघड झाले. नुश्की सीपेकच्या पश्चिम टोकाला इराण सीमे जवळ आहे. क्वेटाहून जाणारा मार्ग नुश्की दल्बंदीन येथून इराणच्या सीमीवरील ताफ्तानकडे जातो. ग्वादर बंदराला जोडणारा हाच मार्ग आहे, हाच मार्ग इराणमधून पुढे आखातात जातो. त्यामुळे नुश्की हा महत्वाचा चोक पॉईंट आणि सामरीक दृष्टीने महत्वाचे केंद्र आहे. इराण, अफगाण, पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेला भूभाग. शस्त्र, ड्रग्ज, खनिजे आणि तेलाच्या तस्करीचा महत्वाचा टप्पा. पाकिस्तानला मिळणारे स्वस्त तेलाची इराणहून याच मार्गाने तस्करी होते. याच मार्गाने इराणमधून सुमारे १ कोटी लिटर तेलाची दर महीन्याला पाकिस्तानमध्ये तस्करी होते. पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करून अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानात पळून जाण्यासाठीही हा मार्ग सोयीचे आहे. ३१ जानेवारी रोजी इथे हल्ला झाला आणि पुढचे तीन दिवस म्हणजे ३ फेब्रुवारीपर्यंत नुश्की बीएलएच्या ताब्यात होते.
बलोचिस्तान हा मोठा प्रांत आहे. इथे एकेक वस्ती ३५ किमी अंतरावर आहे. त्यामुळे सुरक्षा दलांना इथे नियंत्रण आणि टेहळणी करणे कठीण जाते. अशी सारवासारव ख्वाजा आसिफ यांनी केलेली आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे चीनला सांगितले आहे, की मामला आम्हाला झेपणारा नाही. अफगाणिस्तान या बंडखोरांना आश्रय देतो, त्यांच्या मागे भारत आहे, असा आरोप करून ते मोकळे झाले. काश्मीरमध्ये गेली अनेक वर्षे रक्ताचा सडा सांडणारा पाकिस्तान सांगतोय, तुम्ही तुमच्या हिंसाचाराला देशभक्तीचा मुखवटा घालण्याचा प्रय़त्न करत असाल तर आम्ही ते स्वाकीरणार नाही.
नॅशनल एसेंब्लीमध्ये ख्वाजा आसिफ यांनी भारतावर ठपका ठेवल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला परखड शब्दात सुनावले आहे, तुमच्या अपयशाचे खापर आमच्यावर फोडण्या ऐवजी बलोचिस्तानच्या लोकांच्या मागण्यांकडे लक्ष द्या, असा सल्ला दिलेला आहे. पाकिस्तानने जे हत्यार भारताच्या विरोधात अनेक वर्षे वापरले तेच दहशतीचे प्रयोग जेव्हा पाकिस्तानच्या विरोधात सुरू झाले तेव्हा तिथे रडारड सुरू झालेली आहे. हिंसाचाराचा ज्यांनी शस्त्र म्हणून प्रयोग केला ते आता हिंसाचारापुढे गुढगे टेकताना दिसतायत.
बलोच लढवय्यांकडे अमेरिकी शस्त्र आहेत, ती अफगाणिस्तानने विकली असे गृहीत धरले तरी ती विकत घेण्या इतपत, वापरण्या इतपत बलोच लढवय्ये तयार झालेले आहेत. त्यांना रसद मिळते आहे. मुठभर बलोच बंडखोरांच्या विरोधात ज्या पाकिस्तानी सैन्याचा टीकाव लागत नाही, त्यांचा वापर करून भारताला रोखण्याचा चीनचा मनसुबा आहे. पाकिस्तानची रग, चीनचा तो खतरनाक मनसुबा आणि सीपेकचे ढोल एकत्रितपणे वाजतायत. सीपेकला मैत्रीचे स्मारक बनवण्याचा चीन आणि पाकिस्तानच्या अभद्र युतीचा इरादा होता. सध्या तरी ती या मैत्रीची कबर बनणार असे चित्र दिसते आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







