छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात २२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. हे नक्षलवादी अबुझहमाड परिसरात सक्रिय होते आणि त्यांच्यावर एकूण ३७.५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. शुक्रवारी (११ जुलै) एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कुतुल, नेलनार आणि इंद्रावती क्षेत्र समित्यांमधील नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि इंडो-तिबेटी सीमा पोलिस (आयटीबीपी) यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये १४ पुरुष आणि ८ महिलांचा समावेश आहे.
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांपैकी विभागीय समिती सदस्य मनकु कुंजम (३३) याच्या डोक्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस होते, तर क्षेत्र समिती सदस्य हिदमे कुंजम (२८), पन्ना लाल उर्फ बोटी (२६) आणि सानिराम कोरम (२५) यांच्या डोक्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. तर अकरा नक्षलवाद्यांवर प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस होते, तर इतर सात जणांवर ५०,००० रुपयांचे बक्षीस होते, असे त्यांनी सांगितले.







