भारताला १९८३ मध्ये पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या आणि देशाच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी नाव कोरणाऱ्या पहिल्या ‘अँग्लो-इंडियन क्रिकेटर’ म्हणजे रोजर बिन्नी. त्यांचा जन्म १९ जुलै १९५५ रोजी बंगळुरूमध्ये झाला होता.
ऑलराउंडर असलेल्या बिन्नी यांनी बल्लेबाजी, गोलंदाजी आणि फील्डिंग या तिन्ही क्षेत्रांत आपला ठसा उमटवला. दोन्ही बाजूंनी स्विंग करणारी शैली, आक्रमक फलंदाजी आणि चपळ फील्डिंग यामुळे ते लवकरच भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनले.
१९७७-७८ मध्ये केरलविरुद्ध रणजी सामन्यात संजय देसाईसह सलामीसाठी ४५१ धावांची भागीदारी करताना त्यांनी २११ धावा फटकावल्या. यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९७९ साली पदार्पणाची संधी मिळाली.
१९८३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध टेस्ट सामन्यात त्यांनी नाबाद ८३ धावा करत मदन लालसोबत सातव्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी केली. हिच कामगिरी भारताच्या ऐतिहासिक विजयाला कारणीभूत ठरली.
१९८३ च्या विश्वचषकात कमाल
रोजर बिन्नी यांनी त्या विश्वचषकात ८ सामन्यांत १८.६७ च्या सरासरीने १८ बळी घेतले, जे स्पर्धेतील सर्वाधिक होते. त्यामुळे भारताला पहिल्यांदाच क्रिकेट वर्ल्ड कप जिंकता आला.
त्यांनी २७ टेस्ट सामन्यांत ४७ विकेट्स, आणि ७२ वनडेत ७७ विकेट्स घेतल्या. फलंदाज म्हणूनही त्यांनी टेस्टमध्ये ८३० धावा (५ अर्धशतकांसह) आणि वनडेत ६२९ धावा केल्या.
१९८७ पर्यंत त्यांनी भारतासाठी क्रिकेट खेळले आणि नंतर प्रशिक्षक म्हणून उदयास आले. २००० मध्ये अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांचे योगदान लक्षणीय ठरले.
२००७ मध्ये बंगाल संघाचे कोच, २०१२ मध्ये राष्ट्रीय निवड समितीत स्थान आणि अखेर २०२२ मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत वाढत गेली.
पुत्रही क्रिकेटपटू
रोजर बिन्नींच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी यानेही भारताकडून ६ टेस्ट, १४ वनडे आणि ३ टी२० सामने खेळले आहेत.







