देशाच्या आगामी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने हालचालींना वेग दिला आहे. उपाध्यक्षपदासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या संसदीय मंडळाची महत्वपूर्ण बैठक उद्या रविवारी (१७ ऑगस्ट) रोजी दिल्लीत होणार आहे.
पक्षाचे वरिष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संसदीय मंडळातील इतर दिग्गज सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाला अंतिम स्वरूप देण्यात येईल, अशी माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे.
भाजपकडे लोकसभेत स्पष्ट बहुमत असून, एनडीए आघाडी राज्यसभेतही मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्या सामाजिक घटकाचा प्रतिनिधी दिला जावा, यावरून पक्षात आतून चर्चा सुरू आहे. या निवडणुकीसाठी मतदान २५ ऑगस्ट २०२५ रोजी होणार असून, निवडणूक आयोगाने यासंदर्भातील अधिसूचना याआधीच जारी केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीए शासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नामांकनात सहभागी होतील. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार २१ ऑगस्ट रोजी आपला अर्ज दाखल करतील.
हे ही वाचा :
रजनीकांत यांच्या सिनेमातील ५० गौरवशाली वर्षांचा सोहळा; पंतप्रधान मोदींकडून खास शुभेच्छा!
ट्रम्प-पुतिन बैठक युक्रेन युद्धबंदीशिवाय संपली!
विभाजनाच्या दिवशी पाकिस्तानने दहशतवाद्यांसाठी ढाळले अश्रू!
अरुणाचल प्रदेशात 14 हजार फुटांवर ‘तिरंगा मार्च’
भाजपचा उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही वृत्तांनुसार, दक्षिण भारत, महिला किंवा अनुसूचित जाती/जमातींमधून उमेदवार देण्याचा विचार पक्ष करत आहे. मात्र अद्याप कोणताही अधिकृत संकेत देण्यात आलेला नाही. या बैठकीनंतर उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.







