उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धामाजवळ, अलकनंदा नदीच्या तीरावर असलेलं ब्रह्मकपाल हे तीर्थक्षेत्र धार्मिक दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. विशेषत: जे लोक आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान आणि श्राद्धकर्म करतात, त्यांच्यासाठी या स्थळाचं अनन्यसाधारण स्थान आहे. असं मानलं जातं की हीच ती भूमी आहे जिथं स्वत: भगवान शिवांनी ब्रह्महत्येसारख्या महापापातून मुक्ती मिळवली होती.
मान्यता आहे की ब्रह्मकपालात पिंडदान केल्यास शंभर पिढ्यांपर्यंतच्या पितरांना मोक्ष मिळतो. गरुड पुराण आणि स्कंद पुराण यामध्ये या तीर्थस्थानाचं विशेष वर्णन केलं गेलं आहे. असं सांगितलं जातं की जे पितर इतरत्र मुक्ती न पावलेले असतात, त्यांचं इथं विधिपूर्वक श्राद्ध केल्यास त्यांना सद्गती मिळते. ब्रह्मकपालावर पुरोहितांच्या सहाय्यानं विधिपूर्वक पिंडदान आणि श्राद्धकर्माचं आयोजन केलं जातं.
हेही वाचा..
“२०२९ मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होतील, माझा पूर्ण विश्वास”
भारतीय सेनेने मोठा अनर्थ टाळला
ॲपल करणार आयफोन १७ सीरिज लॉन्च
ब्रह्मकपालाची कथा पुराणांशी निगडित आहे. सृष्टीच्या आरंभी भगवान ब्रह्मानं आपल्या मनातून चार मुखांची उत्पत्ती केली, जेणेकरून ते चारही दिशांना पाहू शकतील. पण नंतर त्यांनी पाचवं मुख उत्पन्न केलं जे वरच्या दिशेला होतं. या पाचव्या मुखानंतर ब्रह्माच्या मनात अहंकार आला. त्यांनी स्वत:ला सृष्टीत सर्वोच्च मानायला सुरुवात केली. त्यांनी असा दावा केला की ते शिवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. भगवान शिवांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते न जुमानल्यामुळे क्रोधित होऊन शिवांनी आपल्या त्रिशूलानं ब्रह्माचं पाचवं शिर छाटलं.
हे शिर शिवांच्या हाताला चिकटलं आणि त्यांच्यावर ब्रह्महत्येचं पाप आलं. या घोर पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवांना भिक्षाटन करावं लागलं. ते संपूर्ण जगभर भटकले, पण ब्रह्माचं कापलेलं शिर त्यांच्या हातातून सुटलं नाही. शेवटी ते बद्रीनाथला पोहोचले तेव्हा ब्रह्माचं शिर त्यांच्या हातातून पडलं. ज्या ठिकाणी ब्रह्माचं शिर पडलं, त्या स्थळाला पुढे ब्रह्मकपाल म्हणलं जाऊ लागलं.
असंही मानलं जातं की गोत्रहत्येच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी पांडवांनी आपल्या परिजनांच्या आत्मशांतीसाठी ब्रह्मकपालावर पिंडदान केलं. त्यामुळे या ठिकाणाचं धार्मिक महत्त्व आणखी वाढलं. गरुड पुराणात नमूद आहे की ब्रह्मकपालाइतकं पुण्य देणारं दुसरं कोणतंही तीर्थ नाही. इथं केलं जाणारं पिंडदान अंतिम मानलं जातं. त्यानंतर त्या पितरासाठी दुसरीकडे पिंडदान किंवा श्राद्धकर्म केलं जात नाही. पितृपक्षादरम्यान इथे हजारो लोक आपल्या पितरांच्या श्राद्धासाठी एकत्र येतात.







