२०२२ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सत्तेत राहण्यासाठी सत्तापालट करण्याचा कट रचल्याबद्दल ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका पॅनेलने माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना २७ वर्षे आणि तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यापूर्वी, २०२२ च्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सत्तेत राहण्यासाठी सत्तापालटाचा कट रचल्याप्रकरणी ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांना दोषी ठरवले होते. या निर्णयानंतर न्यायालयाने त्यांना २७ वर्षांची शिक्षा सुनावली. हा निर्णय बोल्सोनारो यांनी उभारलेल्या लोकप्रिय अति-उजव्या चळवळीसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या पॅनेलने दिलेल्या निर्णयामुळे बोल्सोनारो हे लोकशाहीवर हल्ला केल्याबद्दल दोषी ठरलेले देशाच्या इतिहासातील पहिले माजी राष्ट्रपती ठरले आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना नापसंती दर्शविली.
बोल्सोनारो यांना शिक्षा सुनावताना न्यायमूर्ती कार्मेन लुसिया म्हणाल्या, ‘पुरावे स्पष्टपणे दर्शवितात की बोल्सोनारो यांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी शक्य ते सर्व केले. ते एका संघटित टोळीचा नेता होते.’ या प्रकरणाचे निरीक्षण करणारे न्यायमूर्ती अलेक्झांडर डी मोरेस यांनी असेही म्हटले की बोल्सोनारो हा एका सत्तापालटाचा कट रचणारा आणि गुन्हेगारी संघटनेचा नेता होता.
ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापैकी चार न्यायाधीशांनी माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांना पाच गंभीर गुन्ह्यांबाबत दोषी ठरवले. यामध्ये सशस्त्र गुन्हेगारी संघटनेत सहभागी होणे, हिंसक मार्गाने लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करणे, सत्तापालटाचा कट रचना, सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि संरक्षित सांस्कृतिक वारशाचे नुकसान करण्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या आरोपांमधून चार न्यायाधीशांनी एकमताने दोष सिद्ध झाल्याचे मान्य केले, तर एका न्यायाधीशाने बोल्सोनारो यांना निर्दोष ठरवण्यासाठी मतदान केले.
हे ही वाचा :
नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असणारे कुलमान घिसिंग कोण आहेत?
छत्तीसगडमध्ये चकमक: १ कोटींच्या इनामी कमांडर बालकृष्णसह १० नक्षली ठार!
अन्न पचत नाही, वारंवार जावं लागतं प्रसाधनगृहात?
दरम्यान, सध्या ब्राझीलियामध्ये नजरकैदेत असलेले बोल्सोनारो यांनी नेहमीच हे आरोप फेटाळले आहेत. त्यांना निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा अधिकार आहे. न्यायालयाकडे निर्णय प्रकाशित करण्यासाठी ६० दिवस आहेत, त्यानंतर बोल्सोनारो यांचे वकील ५ दिवसांत स्पष्टीकरणासाठी अर्ज दाखल करू शकतात.







