अमृतसरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) मोठी कारवाई करत सीमा कुंपणाच्या दिशेने संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला गोळीबारात ठार केले. ही घटना अमृतसरमधील घरिंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दौके सीमा चौकी परिसरात रात्रीच्या वेळी घडली. बीएसएफच्या १८१ बटालियनचे जवान सीमेवर गस्त घालत असताना त्यांना कुंपणाजवळ एका व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. जवानांनी त्याला थांबण्यासाठी आवाज देत वारंवार इशारा आणि चेतावणी दिली. मात्र, संबंधित व्यक्ती थांबण्याऐवजी पाकिस्तानच्या दिशेने असलेल्या सीमा कुंपणाकडे पुढे जात राहिला. परिस्थिती धोकादायक बनत असल्याचे लक्षात येताच बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. या गोळीबारात संशयित गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हे ही वाचा:
‘जेन झी’ची काही लोकांनी दिशाभूल केली!
स्लीप मॅक्सिंगचा ट्रेंड; चांगली झोप म्हणजेच उत्तम आरोग्य?
चाकरमान्यांनो खुशाल जावा; आपल्या गावा
दीपके अँड कंपनीची म्हणून झारखंडला टांग |
घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने संपूर्ण परिसराची झडती घेतली. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून तो भारतीय नागरिक आहे की पाकिस्तानचा, हेही स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात त्याच्याकडे तंबाखूचे एक पाकीट आढळले आहे. मात्र, सीमा कुंपणाजवळ रात्रीच्या वेळी तो नेमका कशासाठी पोहोचला होता, त्याचा उद्देश काय होता आणि तो पाकिस्तानच्या दिशेने का जात होता, याचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे. त्याच्यासोबत आणखी कोणी व्यक्ती होती का, याचाही शोध घेतला जात आहे.
गोळीबाराच्या या घटनेनंतर अमृतसरच्या सीमावर्ती भागातील सुरक्षा आणि निगराणी आणखी कडक करण्यात आली आहे. बीएसएफसह इतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून परिसरात अतिरिक्त तपासणी आणि गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान, मृत संशयिताचा मृतदेह अमृतसरच्या गुरु नानक देव रुग्णालयात ठेवण्यात आला असून त्याची ओळख आणि या संपूर्ण घटनेमागील नेमका उद्देश शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
