राहुल गांधी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाला उचलून धरत भारतीय अर्थव्यवस्था मृत झाल्याचे विधान केले होते. त्यावर व्यावसायिक आणि स्तंभलेखक सुहेल सेठ यांनी राहुल गांधींवर जोरदार प्रहार केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी आणि डोनाल्ड ट्रम्प हे बौद्धिकदृष्ट्या एकाच पातळीवर आहेत. राहुल गांधींचे वर्तन पाहता त्यांना समुपदेशनाची गरज आहे.
एएनआयशी बोलताना ते म्हणतात की, मला आश्चर्य वाटते की, विरोधी पक्षनेता भारताचा एवढा विरोध करतो, एवढा द्वेष करतो. भारताच्या अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था म्हणतो. स्वतःमध्येच गुरफटलेल्या या व्यक्तीला आता सहन करणे कठीण बनले आहे.
राहुल गांधी यांना कळले पाहिजे. की ते जी विधाने करत आहेत, ती कौतुकास्पद आहेत असे त्यांना वाटत असेल पण तसे ते नाही. ती विधाने बुद्धीदारिद्र्याचे उदाहरण आहेत. काँग्रेसने हे ओळखले पाहिजे की, भारत जे काही करत आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा विरोध आणि द्वेष करून तुम्ही कोणतीही निवडणूक जिंकू शकणार नाही. त्यांचा मोदींविषयीचा द्वेष आणि त्यांच्यात असलेली प्रचंड कटुता ही आता भारताविरुद्धचा द्वेष बनला आहे. राहुल गांधींना मदतीची आवश्यकता आहे, त्यांना समुपदेशनाची खूप गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
कोलकातामध्ये बांगलादेशी मॉडेलला अटक!
परभणीत भाजपाची नवी महानगर कार्यकारिणी सज्ज!
मालेगाव स्फोट प्रकरणी सरसंघचालक भागवत यांना अटक करण्याचे आदेश होते!
भारतावरील २५ टक्के कर आता एका आठवड्यासाठी पुढे ढकलला!
सेठ म्हणतात, त्यांचे संसदेतील वागणे पाहा, त्यांचे लोकांशी बोलणे पाहा, तुम्ही नरेंद्र मोदींचा द्वेष करत आहात पण ते भारताचे पंतप्रधान म्हणून मागच्या दाराने आलेले नाहीत तर ते लोकांनी निवडून दिलेले पंतप्रधान आहेत. त्यामुळे अशा संविधानिक पदावरील व्यक्तीचा आदर बाळगला गेला पाहिजे, तशी वर्तणूक असली पाहिजे. पण दुर्दैवाने हे सगळे नाहीए. त्यामुळे मला याची चिंता वाटते की, राहुल गांधी हे अनेक लोकांना निराश, नाराज करत आहेत. त्यामुळे मी राहुल गांधी आणि डोनाल्ड ट्रम्प यांना बौद्धिक पातळीवर एकाच पंगतीत बसवेन.
सेठ यांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांना अर्थशास्त्राची आणि राजकारणाची कोणतीही जाण नाही. आज अमेरिकन हे त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदामुळे कंटाळलेले आहेत. खरे तर ट्रम्प हे दंडेलशहा आहेत आणि अशी दंडेलशाही करणारे हे मुळात भित्रे असतात. द्विराष्ट्रीय संबंधांमध्ये वगैरे त्यांना रस नाही. त्यांनी आपल्या मित्रराष्ट्रांनाच नाराज केले आहे. त्यामुळे ट्रम्प काय म्हणतात याला अर्थ नाही. भारत निर्यात कमी करतो आणि आयात जास्त करतो. त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयाचे परिणाम शेअर बाजारावर झालेले नाहीत. शेअर बाजाराला ट्रम्प यांच्या निर्णयांची फिकीर नाही.







