नालासोपाऱ्यात केक खाऊन अनेकजण अस्वस्थ

महापौर अजीव पाटील यांनी केली रुग्णांची विचारपूस

नालासोपाऱ्यात केक खाऊन अनेकजण अस्वस्थ

नालासोपारा पूर्वेतील नीलकंठेश्वर इमारतीत वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आणलेला केक खाल्ल्यानंतर ११ जणांची प्रकृती बिघडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केक खाल्ल्यानंतर संबंधितांना अचानक उलटी, मळमळ, पोटदुखी आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवू लागला. प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने नालासोपारा येथील विजयलक्ष्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलीच्या वाढदिवसानिमित्त केक खरेदी करण्यात आला होता. वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थितांनी केक खाल्ल्यानंतर काही जणांना अचानक त्रास जाणवू लागला. त्यानंतर सर्व संबंधितांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. काही वृत्तांनुसार, केकमध्ये मृत पाल आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याची तसेच विषबाधेचे नेमके कारण काय आहे, याची अधिकृत पुष्टी तपासणी अहवालानंतरच होणार आहे.

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनानेही गंभीर दखल घेतली आहे. महापौर अजीव पाटील यांनी विजयलक्ष्मी रुग्णालयाला भेट देऊन दाखल रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. डॉक्टरांकडून रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांनी उपचारांचा आढावाही घेतला. बाधितांना महानगरपालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. केकचा नमुना तपासणीसाठी घेण्यात येणार असून, हा केक नेमका कुठून खरेदी करण्यात आला, तो तयार करताना कोणत्या प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आणि संबंधितांची प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली, याचा तपास केला जाणार आहे. त्यामुळे केकच्या गुणवत्तेसोबतच संबंधित दुकानातील स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांच्या पालनाचाही मुद्दा आता महत्त्वाचा ठरणार आहे.

या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून संबंधित केक विक्रीच्या दुकानाची तपासणी करण्यात आली असून, अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. दुकानातून केकचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. तपासणीमध्ये अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित दुकानाविरोधात नियमानुसार कठोर कारवाई होऊ शकते.

हे ही वाचा:
संविधानाची प्रत घेऊन फिरणाऱ्यांची त्यावर श्रद्धा मात्र नाही

हायकोर्ट लिपिक भरती परीक्षेत गोंधळ; सर्व्हर डाऊन, संतप्त विद्यार्थ्यांचा ठिय्या

सोनिया गांधींनी केलेल्या पापाला जनता माफ करणार नाही!

उदय सामंतांच्या दौऱ्याआधी चाकण एमआयडीसीत रातोरात खड्डे बुजवले

या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून संबंधित केक विक्रीच्या दुकानाची तपासणी करण्यात आली असून, अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. दुकानातून केकचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. तपासणीमध्ये अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित दुकानाविरोधात नियमानुसार कठोर कारवाई होऊ शकते.

Exit mobile version