बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. अशोकधाम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने सात भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी भगवान शंकराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दाखल झाले होते.
ही घटना सकाळी सुमारे ६.४५ वाजता घडली. प्राथमिक माहितीनुसार, मंदिर परिसरात अचानक विद्युत तार तुटून पडल्याने भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यानंतर गर्दीत एकच धावपळ सुरू झाली आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.
लखीसरायचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा प्रचंड वाढली होती. गर्दीच्या दबावामुळे मंदिर परिसरातील बॅरिकेडिंगचा एक भाग तुटला आणि अनेक भाविक एकमेकांवर पडले. जखमींना तातडीने लखीसराय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठी गर्दी झाल्याचे सांगितले. अरुंद आणि उताराच्या मार्गावरून भाविक मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना मागून गर्दीचा दबाव वाढला. त्यामुळे बॅरिकेडिंग कोसळून अनेक भाविक खाली पडल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
सोनियांवरून माकपने काँग्रेसला विचारला जाब
मुलुंडमध्ये कॉलेज तरुणींना लक्ष्य करणारा नराधम जेरबंद
बांगलादेशाविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया करणार संघबदल
आयफोन १८ प्रो मॅक्समध्ये असणार ५४००mAh बॅटरी, ४८MP कॅमेरा?
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमागील नेमके कारण आणि गर्दी नियंत्रणाच्या व्यवस्थेबाबत प्रशासनाकडून तपास केला जात आहे. श्रावणातील सोमवार असल्याने पहाटेपासूनच अशोकधाम मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. त्यामुळे गर्दीचा अंदाज घेऊन प्रशासनाने केलेली व्यवस्था अपुरी ठरल्याचेही प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनेनंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
