कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर पेईंग गेस्ट (PG) सुविधा देणाऱ्या मालकाने कथितपणे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीने पीजीमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या १० दिवसांत ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिस सूत्रांनुसार, पीडितेने सोलदेवनहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत तिने नमूद केलं की, पीजीचा मालक अशरफ रात्रीच्या वेळी तिला बाहेर जाण्यास सांगत होता. जेव्हा तिने नकार दिला, तेव्हा त्याने तिला जबरदस्ती कारमध्ये बसवून एका निर्जन ठिकाणी नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
घटनेनंतर पीडितेने धाडस दाखवत थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी अशरफला अटक करण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी सांगितले की, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि दोषीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सध्या तपास सुरु असून इतर साक्षीदार आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा..
अनुच्छेद ३७० हटवून झाली ६ वर्षे
७५० वर्षांपासून चालणारी परंपरा काय आहे?
उषा ठाकूर यांनी साध्वी प्रज्ञा यांचे केले अभिनंदन
लक्षवेधी म्हणजे, याच वर्षाच्या सुरुवातीला – १४ जानेवारीला – बेंगळुरूमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. पीडितेचे आई-वडील कामासाठी बाहेर गेले असताना आरोपीने या घटनेचा गैरफायदा घेतला. या प्रकरणात बिहारचा रहिवासी अभिषेक कुमार (२५) याला अटक करण्यात आली होती. तो राजमिस्त्री म्हणून काम करत होता. त्याने मुलीला एकटी पाहून तिला फसवून बाहेर नेलं आणि तिच्यावर बलात्कार केल्याचं उघड झालं होतं.







