लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपा नेते पियूष गोयल पहील्यांदा आमच्या कार्यालयात आले होते. ते उत्तर मुंबईतून मैदानात उतरले होते. माझे कार्यालय त्यांच्याच मतदार संघात आहे. आम्ही न्यूज डंका नावाचा डीजिटल मीडिया चालवतो. पियूषजींनी त्यांच्या प्रचार काळातील पहिली मुलाखत न्यूज डंकाला दिली. त्यानंतर अनेकदा ते आमच्या कार्यालयात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर वाणिज्य मंत्रालय सोपवले आहे. जगभरात ट्रम्प टेरीफमुळे हलकल्लोळ माजलेला असताना अनेक महत्वाच्या देशांशी मुक्त व्यापार करार करून त्यांनी भारताची बाजू भक्कम केलेली आहे.

भाजपाकडे सुशिक्षित नेत्यांची फळी आहे. असे अनेक नेते मोदींच्या टीममध्ये आहेत. त्यात पियूषजींचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. मोदींसोबत काम करणे सोपे नाही. कारण जेव्हा तुमचा नेता १८ तास काम करत असतो, तेव्हा तुमची जबाबदारी वाढते. पंचाहत्तरीला आलेले मोदी जर सुट्टी घेत नसतील तर त्यांच्या शिलेदारांनाही घडाळ्याचा काटा आणि कॅलेंडर पाहण्याची सोय नसते.

त्यांचे वडील वेदप्रकाश गोयल भाजपाचे दिग्गज नेते होते. अनेक वर्षे ते भाजपाचे कोषाध्यक्ष होते. आई चंद्रकांता गोयल या भाजपाच्या आमदार होत्या. त्यामुळे घरातील वातावरण भाजपामय होते. दोघेही आज हयात नाहीत. दोघांच्या कठोर शिस्तीत पियूषजींची जडणघडण झाली. वडील भाजपाचे नेते आहेत, नेत्यांच्या वरीष्ठ फळीत काम करतात म्हणून पियूषजींच्या डोक्यात कधी हवा गेली नाही. ते सतत हसतमुख असतात. बोलणेही अत्यंत सौम्य, परंतु निग्रही असते. प्रसंगी ते किती कठोर भूमिका घेऊ शकतात, याची झलक व्यापार कराराबाबत अमेरिकेशी सुरू असलेल्या वाटाघाटीच्या दरम्यान पाहायला मिळाली. ‘अमेरिकेने दिलेल्या डेडलाईनची आम्हाला चिंता नाही. जेव्हा भारताच्या हिताचा करार आहे असे आम्हाला वाटेल तेव्हा त्यावर शिक्कामोर्तब होईल. कृषी आणि डेअरी या आमच्या रेडलाईन आहेत, त्यांचे कोणालाही उल्लंघन करता येणार नाही’, अशी परखड भूमिका त्यांनी सातत्याने घेतली. सध्या व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटी थंड्या बस्त्यात टाकण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. ही बाबही सूचक आहे.
अमेरिकेने टेरीफास्त्राचा भारताच्या विरोधा वापर केला असताना पियूषजींनी भारताच्या निर्यातीचे विकेंद्रीकरण करण्याचे धोरण अवलंबले आणि ते करूनही दाखवले. अमेरिका कराराबाबत आडमुठी भूमिका घेत असताना भारत यूके, युरोपियन युनियनसोबत करार करून मोकळा झाला. अनेक देशांशी आपली चर्चा सुरू आहे. भारताची बलस्थाने त्यांना व्यवस्थित ठाऊक आहेत. ती जगाला ठणकावून सांगण्याचे काम पियूषजींनी केले आहे. त्यांच्यात एक ‘टफ निगोशिएटर‘ याची प्रचिती अनेक नेत्यांनी घेतलेली आहे.
व्यावसायिक म्हणून मला त्यांचे सर्वात जास्त कौतुक वाटते ते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार करारांमध्ये त्यांनी भारताची बाजू ज्या पद्धतीने लावून धरली, त्याबद्दल. पीयूषजी हे भारताच्या अटींवर जगाला व्यापार करायला लावणारे एक कुशल मुत्सद्दी आहेत. अनेक दशकांपासून रखडलेले हे करार त्यांनी अत्यंत कमी वेळात पूर्ण केले, पण ते करताना भारताच्या उद्योजकांचे आणि कामगारांचे हित जपण्याचे काम केले.
अमेरिकेसारख्या महासत्तेसोबत व्यापार करताना किंवा युरोपियन युनियनशी वाटाघाटी करताना पीयूषजींनी नेहमीच ‘पोझिशन ऑफ स्ट्रेंथ‘ मधून संवाद साधला आहे. “आम्ही कोणाच्याही दबावाखाली किंवा घाईने करार करणार नाही, तर तो करार भारतासाठी न्याय्य आणि संतुलित असेल तरच पुढे जाऊ,” ही त्यांची भूमिका प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशीच आहे.
आमच्या कार्यालयातील भेटींदरम्यान मला त्यांचे एक वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवले, ते म्हणजे ‘डिटेलिंग‘वर त्यांचा असलेला भर. पीयूषजी हे चार्टर्ड अकाउंटंट असल्याने त्यांच्याकडे आकड्यांची आणि नियमांची अचूक जाण आहे. “देशाचा विकास करायचा असेल तर आपण केवळ स्वप्न पाहून चालणार नाही, तर त्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी सूक्ष्म नियोजन हवे,” हा त्यांचा मंत्र मला नेहमीच प्रेरणा देतो.
देशाचा व्यापार, स्टार्टअप इंडिया किंवा ‘मेक इन इंडिया’, आत्मनिर्भर भारत या विषयांवर वर चर्चा करताना ते रंगात येतात. त्यांच्या डोक्यात भन्नाट कल्पना असल्याचे आपल्या लक्षात येते. मुंबईचे सुपुत्र असल्याने त्यांच्याशी गप्पा मारताना एक वेगळेच ‘मराठी’ आपलेपण जाणवते. ते उद्योजक आणि व्यावसायिक जगताची नस ओळखणारे नेते आहेत.
पीयूषजी गोयल यांच्याकडे भविष्याचा वेध घेणारी दृष्टी आहे. राजकारण हे सत्ता मिळवण्याचे साधन नसून राष्ट्रनिर्मितीचे आणि भारताला ‘विकसित भारत २०४७‘ कडे नेण्याचे एक माध्यम आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. भारताचे भविष्य घडवणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.







