26 C
Mumbai
Wednesday, January 14, 2026
घरविशेषक्रिकेटसम्राट कपिल देव यांचा आज वाढदिवस

क्रिकेटसम्राट कपिल देव यांचा आज वाढदिवस

Google News Follow

Related

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये कपिल देव यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. भारताला पहिले विश्वचषक विजेतेपद मिळवून देणारे कर्णधार म्हणूनही त्यांची ओळख आहे. वेगवान गोलंदाजी, आक्रमक फलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर कपिल देव यांनी भारतीय संघात आत्मविश्वासाची नवी लाट निर्माण केली.

६ जानेवारी १९५९ रोजी चंदीगड येथे जन्मलेल्या कपिलदेव रामलाल निखंज यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. ऑक्टोबर १९७८ मध्ये त्यांनी प्रथम एकदिवसीय, त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे, दोन्ही पदार्पण सामने पाकिस्तानविरुद्धच झाले.

कारकिर्दीच्या तिसऱ्याच कसोटी सामन्यात कपिल देव यांनी पाकिस्तानविरुद्ध अवघ्या ३३ चेंडूत अर्धशतक झळकावत भारताचा सर्वात जलद कसोटी अर्धशतकाचा विक्रम केला. १९७९-८० मधील पाकिस्तानविरुद्धच्या घरच्या मालिकेत त्यांनी अष्टपैलू कामगिरी करत ३२ बळी घेतले आणि फलंदाजीत २७८ धावा केल्या. सहा सामन्यांच्या या मालिकेत भारताने २-० असा विजय मिळवला.

वेगवान आणि स्विंग गोलंदाजीसाठी ओळखले जाणारे कपिल देव अनेकदा सामन्याचा निकाल फिरवणाऱ्या खेळींसाठी प्रसिद्ध होते. आक्रमक फलंदाजीसोबतच ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होते.

१८ जून १९८३ रोजी विश्वचषकातील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कपिल देव यांनी नाबाद १७५ धावांची ऐतिहासिक खेळी केली. भारताची अवस्था १०३ धावांत पाच बाद अशी झाली असताना, १३८ चेंडूत ६ षटकार आणि १६ चौकारांच्या मदतीने त्यांनी भारताचा डाव २६६/८ पर्यंत नेला. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ २३५ धावांत आटोपला. या सामन्यात कपिल देव यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला, मात्र बीबीसीच्या संपामुळे हा सामना दूरदर्शनवर दाखवला गेला नाही. याच विश्वचषकात त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिले विश्वविजेतेपद पटकावले.

कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १३१ सामने खेळत २२७ डावांत ५,२४८ धावा केल्या आणि ४३४ बळी घेतले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २२५ सामन्यांत ३,७८३ धावा आणि २५३ बळी त्यांच्या नावावर आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी ११,३५६ धावा केल्या, तर लिस्ट ‘ए’ क्रिकेटमध्ये ५,४८१ धावा आणि ३३५ बळी मिळवले. कसोटी क्रिकेटमध्ये ५,००० धावा आणि ४०० बळी पूर्ण करणारे ते इतिहासातील पहिले खेळाडू ठरले.

क्रिकेटमधील अतुलनीय योगदानासाठी कपिल देव यांना १९७९-८० मध्ये अर्जुन पुरस्कार, १९८२ मध्ये पद्मश्री, १९९१ मध्ये पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले. १९८३ मध्ये विजडन क्रिकेटर ऑफ द इयर, २००८ मध्ये भारतीय प्रादेशिक सेनेत मानद लेफ्टनंट कर्नल पद, २०१० मध्ये आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम आणि २०१३ मध्ये सी.के. नायडू लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा