दुबईत नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या मुलाचा अचानक आजारपणामुळे मृत्यू झाला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना मुलाचा मृतदेह तरी कसा आणायचा या विवंचनेत असलेल्या कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मदतीचा हात दिला.
दुबईत गेलेल्या मुलाचा अचानक झालेल्या मृत्यूसंदर्भात त्याच्या शेतमजूर असलेल्या कुटुंबियांना कळले आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. कोणाकडे मदत मागावी हे त्यांना कळत नव्हते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत एक एसएमएस आला आणि त्यांनी मदत करत त्या तरुणाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. फडणवीसांनी दिल्ली ते दुबईपर्यंतची सगळी सूत्रे हलवली. पाठपुरावा केला आणि स्वत: खर्च करण्याची तयारी दाखविली. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पाराव पेठ गावातील अंगरवार शेतमजूर दांपत्याला मुलाचे शेवटचे दर्शन शक्य झाले.
श्याम अंगरवार सत्तावीस वर्षांचा तरुण नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून दुबईला नोकरीच्या निमित्ताने गेला होता. या ठिकाणाहून अनेक जण दुबईला नोकरीसाठी जात असतात. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शेतमजूर असलेल्या आईवडिलांचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी श्यामही कामगार म्हणून दुबईला गेला. इमाद नावाच्या कंपनीत त्याला काम मिळाले होते. दुसरी संधी मिळत असल्यामुळे त्याने ही कंपनी सोडली होती.
हे ही वाचा:
ईडीने कॉनकास्ट स्टील प्रकरणात मालमत्ता केली जप्त
इस्रायली अपहृतांची अखेर दोन वर्षांनी सुटका
झारखंड, मिजोरम आणि जम्मू-काश्मीरमध्ये पोटनिवडणुकांसाठी अधिसूचना
आठवड्याभरापूर्वीच, २५ सप्टेंबरला त्याचा वाढदिवस झाला. सगळे आनंदात सुरू होते. मात्र तापाचे निमित्त झाले आणि त्याला दुबई येथील एनएमससी रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, एक ऑक्टोबर रोजी श्यामचा मृत्यू झाला. इकडे किनवटमध्ये त्याच्या आई वडिलांना याची काही कल्पनाच नव्हती. लाडक्या मुलाच्या मृत्यूची बातमी त्यांना तीन दिवसांनंतर चार ऑक्टोबरला समजली. दु:खात बुडालेल्या या शेतमजूर दांपत्याची माहिती वनवासी कल्याण आश्रमाचे काम करणाऱ्या गोवर्धन मुंडे यांना समजली. त्यांनी पाच ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना एक एसएमएस (मेसेज ) करून त्याची माहिती दिली.
एसएमएस वाचल्यावर वेगाने हलवली सूत्रं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतमजूर आई-वडिलांवर गुदरलेल्या या दुःखद प्रसंगाची माहिती मिळाल्यावर मुख्यमंत्री हेलावून गेले. त्यांनी तातडीने सूत्रे हलविली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना सर्व तपशील दिले. पाठपुरावा सुरू केला. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूत्रे हलविली गेली. परराष्ट्र मंत्रालयाशी सतत पाठपुरावा केल्यावर मृत्युचा दाखला मिळाला.
स्वत: वैयक्तिक पातळीवर खर्च करण्याची तयारी
मुख्य प्रश्न होता की एका गरीब कामगाराचे पार्थिव आणणार कसे? त्यासाठीचा खर्च कोण करणार? पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: वैयक्तिक पातळीवर खर्च करण्याची तयारी दर्शविली. मग परराष्ट्र मंत्रालयालाने खर्च करण्याचे मान्य केले. श्याम अंगीरवार यांचे पार्थिव रविवारी मध्यरात्री १२ ऑक्टोबर रोजी दुबईवरून विमानाने हैद्राबाद विमानतळावर आणण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तेथून पुढची व्यवस्था करण्याचे सांगण्यात आले होते . नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने श्यामचे पार्थिव किनवटपर्यंत पोहोचविले. रविवारी १२ ऑक्टोबरला श्यामचा अंत्यविधी झाला.या कठीण प्रसंगात मुख्यमंत्री देवासारखे धावून आल्याने या गरीब दांपत्याला मुलाचे अंतिम दर्शन तरी घेता आले. त्यामुळे हे कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत आहे.







