29 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरविशेषहिमालयाएवढ्या उंच महापुरुषांना छोटे करू नका रे!

हिमालयाएवढ्या उंच महापुरुषांना छोटे करू नका रे!

Google News Follow

Related

सध्या अपमान हा शब्द अगदी स्वस्त झाला आहे. कोणत्याही गोष्टीला अपमान मानून त्यावरून राजकारण करण्याचे प्रकार आपल्या अवतीभवती घडताना दिसून येतात. प्रामुख्याने मीडियात अशा विषयांची चलती असल्यामुळे दिवसागणिक आपल्याला अपमानांची संख्या वाढताना दिसते. मुळात कोण कुणाचा अपमान करू शकतो, याचे काही धरबंद नाहीत. एखाद्या व्यक्तीची पात्रता, कर्तृत्व, महत्त्व नसले तरी तो कोणत्याही श्रेष्ठ व्यक्तीचा अपमान करू शकतो, अशी एक धारणा तयार झाली आहे.

महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला अशी एक चर्चा दिवसभर माध्यमात दाखविली गेली. त्याला फोडणी देण्याचे काम अनेक तथाकथित पत्रकार, विचारवंत, पुरोगामी, विरोधी पक्षातील नेते वगैरेंनी यथाशक्ती केले. सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्यांनाही वेळ जात नसावा, त्यामुळे यावर भाष्य करणे आणि आपल्या डोक्यातील वैचारिक गोंधळ लोकांसमोर मांडणे हे काम त्यांनी करून दाखवले.
अशा काही अपमानांची चर्चा या दोन दिवसात बरीच झाली.

तर गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नाही, म्हणून महिला वनअधिकारी माधवी जाधव यांना संताप आला. त्यांनी त्या कार्यक्रमादरम्यानच गोंधळ घातला. त्यांचा व्हीडिओ सगळीकडे व्हायरल झाला. नंतर त्या पत्रकारांशीही संवाद साधताना दिसल्या आणि महाराष्ट्रातून बाबासाहेबांचे नाव पुसण्याचा हा प्रयत्न असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. मग काय तर सोशल मीडियात माधवी जाधव यांना वाघिणीची उपमा देत सगळ्यांनी गिरीश महाजन यांच्यावर यथेच्छ हात धुवून घेतले. भाषणांमध्ये महापुरुषांच्या नावांचा उल्लेख करणे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करणे ही एक प्रथा आहे. त्यात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने महापुरुषांची निवड करतो. कुणी छत्रपती शिवाजी महाराज, कुणी शाहू फुले आंबेडकर, कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कुणी महात्मा गांधी यांची नावे घेऊन आपल्या भूमिका व्यक्त करत असतो. एकाने एका महापुरुषाचे नाव घेतले आणि दुसऱ्या महापुरुषाचे नाव घेतले नाही म्हणून अपमान होत नाही.

पण मानायचा असेल तर अपमान मानला जातो. गिरीश महाजनांनी हा उल्लेख केला नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि आपल्याकडून अनवधानाने हे घडले आहे, अशी कबुली दिली. २६ जानेवारीचा दिवस म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव प्रत्येकाने घेतलेच पाहिजे असे काही नाही. याचा अर्थ त्यांचा अपमान करण्याचा उद्देश प्रत्येकाचा असतो असेही नाही. राजकारणासाठी सगळ्यांना सोबत घेता यावे म्हणून अनेकजण सगळ्या महापुरुषांची नावे भाषणात घेतात. त्यामुळे त्या महापुरुषांची प्रतिष्ठा खूप वाढते असे अजिबात नाही.

पूर्वी शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी हळूच त्यात शिव हा शब्द घालून शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेचे पाईक असल्याचे सांगायला सुरुवात केली. पण त्यामुळे या सगळ्या महापुरुषांची प्रतिष्ठा वाढली असे अजिबात नाही. त्या पक्षांचा फायदा झाला एवढेच. मुळात गिरीश महाजन असो की आणखी कुणी मंत्री त्यांनी बाबासाहेबांचे नाव घेतले तर बाबासाहेबांची प्रतिष्ठा वाढत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व हे हिमालयाएवढे उंच आहे. त्यांचे नाव कुणी घेतले नाही म्हणून त्यांची उंची कमी होत नाही की घेतल्यावर ती वाढत नाही. त्यामुळे हा निष्कारण विषय चिघळवणारा प्रकार म्हणावा लागेल.

एखाद्याने फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जयघोष केला तर त्याने छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख का केला नाही, असाही युक्तिवाद करून त्याने संभाजी महाराजांचा अपमान केला असा मुद्दा उकरून काढता येईल. पण दुर्दैवाने सोशल मीडियात सारासार बुद्धी वापरणाऱ्यांची प्रचंड कमतरता असल्यामुळे अशा विषयाला जणू आपल्या जीवनमरणाचा प्रश्न केला जातो. माधवी जाधव यादेखील एक सरकारी अधिकारी आहेत. त्यांना ही नाराजी गिरीश महाजनांपर्यंत पोहोचवता आली असती पण तसे न करता त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. आता सरकारी कर्मचारी सरकारमधल्या मंत्र्याविरोधात बोलू शकतो का, त्यासंदर्भातले नियम काय सांगतात हा चर्चेचा विषय होईल.

महत्त्वाचे हे आहे की, महाराष्ट्रात असे असंख्य महापुरुष होऊन गेले ज्यांनी या प्रदेशाचेच नव्हे तर देशाचे नाव उज्ज्वल केले. विविध क्षेत्रात असे महापुरुष आपल्याला आढळतात. त्यांचे आपण गुणगान गातो. त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो. त्यांना मानसन्मान देतो. पण त्यांचे नाव घेतले नाही तर तो अपमान होत नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीने दिलगिरी, माफी मागितली की, तो विषय तिथे थांबलाही पाहिजे. पण त्यावरून लगेच भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून उट्टे फेडण्याची सवय काही लोकांना असते. मात्र त्यातून साध्य काहीही होत नाही. माधवी जाधव यांनी तर आपण यासाठी कोणतीही किंमत चुकवायला तयार आहोत, असे विधान केले आहे. त्यावर कोणती कारवाई होईल माहीत नाही, पण त्यावेळेला हे समर्थन करणारे आसपास कुठेही दिसणार नाहीत.

याचदरम्यान १३ जानेवारीचे अंजली भारती नावाच्या विद्रोही गायिका असलेल्या महिलेचा व्हीडिओदेखील व्हायरल झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गाणी या अंजली भारती गातात. त्यांनी एका मंचावर बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ विधान केले. ते विधान ऐकण्याची कुणालाही लाज वाटेल. विशेषतः एक महिला दुसऱ्या महिलेबद्दल असा विचार करू शकते, याचे आश्चर्य वाटण्याजोगे ते वक्तव्य होते. अशी विधाने केल्याबद्दल अंजली भारती यांच्यावर कारवाई करण्याचे राज्य महिला आयोगाने म्हटले आहे. पण ही विधाने केली कशी जातात, हा प्रश्न मनात येतो. राजकारणी म्हणून आपला विरोध कुणाला तरी असू शकतो. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल किंवा भाजपाबद्दल आकस असू शकतो, पण त्यासाठी त्यांच्या पत्नीबद्दल अशी विधाने करणे कितपत सहन करता येईल? अर्थात, यावर विरोधी पक्षातील नेत्यांनीही आपली बुद्धी शाबूत ठेवत टीका केली. अंजली भारती यांच्या विधानाचा निषेध केला, हे स्वागतार्ह होते.

पण प्रश्न मनात येतो, ज्या महिला विद्रोही गायिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर गाणी लिहितात आणि म्हणतात, त्यांनी एखाद्या महिलेवर अशी अश्लाघ्य भाषा एका मंचावरून वापरावी आणि त्याठिकाणी बसलेल्या लोकांनी शिट्ट्या, आरोळ्या ठोकून त्याला साथ द्यावी हे भयंकर आहे. त्यावर एकाने तिथे पैसेही उडवले. हा खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान नव्हता का? आपण बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करतो पण त्यावेळी आपण एका महिलेप्रती अशी विधाने करतो, ही त्यांच्या विचारांशी असलेली प्रतारणा नाही का, याचे भान यायला नको? यावर ते तथाकथित विचारवंत, पुरोगामी, पत्रकार चकार शब्द बोलले नाहीत. कारण या सगळ्या मंडळींचा उद्देश हा फक्त आणि फक्त राजकारण एवढाच असतो. त्यांना कुणाच्या अपमानाशी, कुणाच्या सन्मानाशी कसलेही देणेघेणे नसते. आपला कार्यभाग साधता आला ना, यावर त्यांचा दांडगा विश्वास असतो. खरे तर, अपमान कशाला म्हणतात, याचीच व्याख्या ज्यांना माहीत नाही, ते रोज उठून अपमान झाला, अपमान झाला म्हणून आरडाओरडा करत असतात.

हे ही वाचा:

आधी ट्रम्पना ठोकले; त्यानंतर केले मदर ऑफ ऑल डील

मुंबईच्या मालवणी परिसरात झालेल्या सिलेंडर स्फोटात ७ जण भाजले

हवालदाराची सव्वा चार लाखांची फसवणूक; ड्युटीवर असताना परस्पर काढले ‘पर्सनल लोन’

घरगुती आणि पौष्टिक आहाराकडे लोकांचा कल

धाराशिवमध्येही असाच प्रकार घडला. तिथे प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेबांचा फोटो नसल्यामुळे मुरूम नगरपरिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यावर शाईफेक करण्यात आली. त्यावर लगेच मनुवादी, जातीयवादी अशी लेबले लावण्यास सुरुवात झाली. फोटो लावला नसेल तर तो लावण्यास सांगता आले असते. पण तसे न करता शाईफेक करण्याचा पर्याय निवडण्यात आला. त्यातून काय झाले? काय हाती लागले? महाराष्ट्रातील महापुरुषांनी आखून दिलेल्या मार्गावर चालणे हे आपले कर्तव्य आहे. पण त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर दुसऱ्याने चालले पाहिजे आपण मात्र चालणार नाही, हेच जणू आजकाल पाहायला मिळते.

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्म पुरस्कार घोषित झाल्यावर अशाच उथळ प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. ज्यांनी महात्मा फुलेंचा, शिवरायांचा अपमान केला त्यांना कसा काय पुरस्कार दिला अशी विचारणा सोशल मीडियात करण्यात आली. मुळात सोशल मीडियात कुणाच्याही वक्तव्यांचा कसाही अर्थ काढून त्याला झोडपून काढण्याची एक पद्धत तयार झाली आहे. आपल्याला हवा तसा सोयीस्कर अर्थ काढायचा, आपल्याला अपमान वाटतोय ना मग तो अपमान असे म्हणत त्या व्यक्तीवर चिखलफेक करायची ही एक सवय बनून गेली आहे. आपण या महापुरुषांच्या पावलावर पाऊल टाकत नेमके आयुष्यात काय केले हे कधीही न सांगणारे दुसऱ्याने कसा अपमान केला हे सांगायला सदैव पुढे असतात. जे रस्त्यांवर थुंकतात, वाहतूकीचे नियम पाळत नाहीत, हे महापुरुषांच्या कर्तृत्वाविषयी बोलण्यात अग्रेसर असतात. याबाबत प्रामुख्याने राजकारण करणाऱ्यांनी भान बाळगण्याची आवश्यकता आहे. आपल्याला कुणाचा राजकीय सूड उगविण्यासाठी अशा वक्तव्यांच्या अर्थाचा अनर्थ करायचा असेल तर भविष्यात ते आपल्याविरुद्धही उलटू शकते, याचे भान राखले पाहिजे. महापुरुषांचे हिमालयाएवढे कर्तृत्व, त्यांचे नाव हे कुणीही कधी पुसू शकत नाही, कुणामध्येही तेवढी क्षमता नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा