मालेगाव महानगरपालिकेत नमाज पढल्याच्या प्रकारावरून विद्युत अधीक्षक अभिजित पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.
या विद्युत विभागात काही मुस्लिम नागरिकांनी नमाज पढल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात एका खोलीत काही मुस्लिम नमाज पढत असल्याचे त्या व्हीडिओत दिसत आहे. त्यावरून सगळीकडे टीका झाली. भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही यावरून टीका केली होती. त्यानंतर पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
पथदीप सुरू नसल्याबद्दल वारंवार तक्रारी करून देखील मनपा विद्युत विभागातर्फे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त नागरिकांनी इथे आंदोलन केले होते. विद्युत अधीक्षक अभिजीत पवार यांना जाब विचारत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमबाजी केली होती. यानंतर अभियंते पवार बैठकीस निघून गेले होते. त्याचवेळी आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी नमाजाची वेळ झाल्यामुळे विद्युत अधीक्षकांच्या कार्यालयातच नमाज पठण केले होते. नमाज पठणाचा हा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. हिंदुत्वादी संघटनांतर्फे नमाजास उत्तर म्हणून आयुक्तांच्या दालनात हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले.
हे ही वाचा:
पॅरामाउंटची ३१ डॉलर्सची दमदार बोली, वॉर्नर ब्रदर्ससाठी नेटफ्लिक्सची माघार
कोलकातामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
हिंदी सक्तीवरून उद्धव ठाकरेंची फडणवीसांनी केली पोलखोल
गोवा नाईटक्लब आग प्रकरणात १३ जणांवर आरोपपत्र
दरम्यान, महानगरपालिका कार्यालयात झालेल्या नमाज पठणाची गंभीर दखल आयुक्त रवींद्र जाधव यांनी घेतली आणि सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आयुक्तांच्या आदेशावरून विद्युत विभागाच्या सेवकाने दाखल केलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल विद्युत अधीक्षक अभिजीत पवार यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्त जाधव यांनी काढले. आस्थापना विभागातर्फे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
महानगरपालिका कार्यालयात नमाज पठण केले गेल्याच्या घटनेची गंभीर दखल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेत या घटनेचा निषेध करत शासकीय कार्यालयात नमाज पठण करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करावे तसेच महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील अधिकारी सेवकांवर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत केली होती.







