केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसचा धोका वाढत असून आणखी एकाला निपाहची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत राज्यात पाच संक्रमित रुग्ण आढळले आहेत. केरळ राज्याचे आरोग्य मंत्र्यांनी याची माहिती दिली असून त्यामुळे आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे.
एका खासगी रूग्णालयातील २४ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्राणघातक निपाह व्हायरसचा संसर्ग वाढत आहे.
यापूर्वी एका ९ वर्षाच्या मुलाला या व्हायरसचा संसर्ग झाला असून डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वीणा जॉर्ज म्हणाल्या, “९ वर्षांचा मुलगा कोझिकोड येथील रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे आणि त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आम्ही ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) कडे मोनोक्लोनल अँटीबॉडीची मागणी केली आहे आणि ते लवकरच कोझिकोडला आणले जाईल.”
जिल्हाधिकाऱ्यांना २४ सप्टेंबरपर्यंत कोझिकोडमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी जमणे टाळण्याचे आदेश जारी करण्याचे अधिकार देण्यात आले आहे, असे वीणा जॉर्ज यांनी सांगितले. केवळ कोझिकोड नव्हे तर डब्ल्यूएचओ आणि आयसीएमआरच्या अभ्यासातून असे आढळून आले आहे की संपूर्ण केरळ राज्याला असे संक्रमण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देखील वीणा जॉर्ज यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
बिहारमधील ‘वैशाली’ लोकशाही उत्सवात प्रियदर्शी दत्तांच्या पुस्तकाचे प्रकाशन
उद्धव ठाकरे यांच्या लंडनमधील प्रॉपर्टीवर शिक्कामोर्तब
वनडे वर्ल्डकपमधील न्यूझीलंड संघातील खेळाडूंच्या नातेवाईकांची अनोखी जाहिरात
फिरकी गोलंदाज कुलदीप ठरला वेगवान
बाधित क्षेत्रात मिनी लॉकडाऊन
बाधित आढळलेल्या परिसरात केवळ जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांनाच काम करण्याची परवानगी असणार आहे. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यामुळे मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूच्या संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना घाबरू नये आणि त्याऐवजी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले होते. प्रत्येकाने आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि निर्बंधांना पूर्ण सहकार्य करावे, असे ते म्हणाले होते.
निपाह माणसाकडून माणसात पसरतो आणि त्याचा मृत्यू दर जास्त आहे, असे आतापर्यंतचे निरीक्षण आहे. केरळमध्ये आढळून आलेला हा विषाणूचा प्रकार बांगलादेशमध्ये आढळला होता.







