तामिळनाडूतील तिरुवल्लूर येथे मालगाडीच्या घडलेल्या अपघातासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रेल्वे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळापासून सुमारे १०० मीटर अंतरावर रेल्वे रुळात एक तडा आढळल्याचे सांगितले. रविवारी सकाळी डिझेलने भरलेली मालगाडी रुळावरून घसरली होती, त्यानंतर तिच्या चार बोगींना आग लागली. रेल्वे अधिकारी आणि पोलिस ही दरार अपघाताच्या मूळ कारणाशी संबंधित आहे का, हे तपासण्याचा प्रयत्न करत आहेत. तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ आग लागलेल्या बोगींच्या ठिकाणी आपत्कालीन पथके पोहोचली आहेत. आग विझवण्यासाठी कांचीपूरम, चेंगलपट्टू आणि चेन्नईसह अनेक जिल्ह्यांतून आलेल्या २५ हून अधिक अग्निशमन गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाचे कर्मचारी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) च्या दोन पथकांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. NDRF पथकप्रमुख संजीव जायसवाल म्हणाले, “सकाळी ७ वाजता माहिती मिळाली की तिरुवल्लूरजवळ एका ट्रेनला आग लागली आहे. ट्रेन चेन्नईहून अरक्कोणमकडे जात होती. आम्ही कलेक्टर कार्यालय आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की आग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे NDRF पथकांची गरज आहे.”
हेही वाचा..
भारत आणि आइसलँडमध्ये सकारात्मक ऊर्जेची समान भावना
कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्यांचे पाय तोडले, ते सदानंदन मास्टर होतायत भाजपाचे खासदार!
आर्थर रोड जेलमध्ये गँगस्टर प्रसाद पुजारीवर हल्ला
पंतप्रधानांकडून राज्यसभेसाठी नामांकित चौघांना शुभेच्छा
मालगाडीच्या चार डिझेलने भरलेल्या बोगींना आग लागल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूच्या नागरिकांना घरातून बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एम. प्रताप यांनी याची पुष्टी करत सांगितले की, मोठ्या प्रमाणात इंधन गळती झाली आहे. महसूल विभाग आणि नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले असून त्यांच्यासाठी अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी प्रताप यांनी सांगितले की, आग अधिक पसरू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने ट्रेनच्या मुख्य भागापासून ४७ बोग्या वेगळ्या केल्या आहेत. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला असून नागरिकांची आवाजाही बंद केली आहे. या घटनेनंतर रेल्वे सेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे. चेन्नईकडे येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेनवर परिणाम झाला आहे. दक्षिण रेल्वेने आठ गाड्या रद्द केल्या असून पाच गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर, इतर आठ गाड्या मार्गातच थांबवण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती दक्षिण रेल्वेने सोशल मीडियावर जाहीर केली आहे.







