चौथ्या कसोटीत भारताने इंग्लंडच्या ड्रॉच्या प्रस्तावाला नकार देत फलंदाजी सुरूच ठेवली आणि दोन्ही फलंदाजांनी आपापले शतक पूर्ण केले. या निर्णयावर इंग्लंडच्या कर्णधाराचा नाराजीचा सूर दिसून आला. मात्र, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपल्या खेळाडूंच्या निर्णयाचं ठाम समर्थन केलं आहे.
चौथ्या कसोटीच्या शेवटच्या ड्रिंक्स ब्रेकवेळी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने सामना ड्रॉ घोषित करण्यासाठी हात मिळवण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र त्या वेळी रवींद्र जडेजा ८९ आणि वॉशिंग्टन सुंदर ८० धावांवर खेळत होते. दोघेही आपल्या शतकाच्या उंबरठ्यावर होते आणि त्यांनी खेळ सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे मैदानावर तणाव निर्माण झाला. सामना संपल्यानंतर औपचारिक हँडशेक दरम्यान स्टोक्सने जडेजा आणि सुंदरकडे दुर्लक्ष केलं, ज्यामुळे चर्चेला आणखी फाटा फुटला.
🎙️ गंभीरचा ठाम सवाल:
प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा याबद्दल गंभीरला विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी थेट प्रत्युत्तर दिलं –
“जर इंग्लंडचा फलंदाज ९० किंवा ८५ वर असता, आणि त्याला पहिलं कसोटी शतक करण्याची संधी असती, तर तुम्ही त्याला थांबवलं असतं का? त्यांचं खेळणं त्यांच्यावर अवलंबून आहे. दोघंही शतकाचे पात्र होते आणि त्यांनी अप्रतिम पद्धतीने शतकं पूर्ण केली,” असं गंभीर म्हणाले.
💥 कशी झाली भागीदारी?
हँडशेकचा प्रस्ताव नाकारल्यानंतर लगेच रवींद्र जडेजाने ब्रुकच्या चेंडूवर छक्का आणि चौकार ठोकला.
वॉशिंग्टन सुंदरनेही ब्रुकच्या गोलंदाजीवर शानदार चौकार मारत भागीदारीला २०० धावांवर नेलं, आणि नंतर सुंदरने सुंदर फ्लिक शॉटवर दोन धावा घेऊन आपलं पहिलं कसोटी शतक पूर्ण केलं.
शतक पूर्ण केल्यावर दोघांनी इंग्लंडच्या खेळाडूंशी औपचारिक हात मिळवले आणि सामना ड्रॉ घोषित झाला.







