जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गुलमर्ग येथे गोंडोला (केबल कार) सेवेत तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवार, २५ मे रोजी मोठा गोंधळ उडाला. तसेच पर्यटकांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर मोठा अपघातही टळला. सेवा अचानक बंद पडल्यामुळे काही पर्यटक केबल कारच्या डब्यांमध्ये हवेत अडकले, त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, तातडीने बचाव मोहीम राबवून अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत असल्याचे सांगितले.
एक्सवरील पोस्टमध्ये मनोज सिन्हा यांनी म्हटले की, “गुलमर्गमध्ये तांत्रिक बिघाडामुळे केबल कारमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या बचाव मोहिमेवर मी लक्ष ठेवून आहे. मी पोलिस महासंचालकांना (डीजीपी) घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत.” त्यांनी सांगितले की, पोलीस, सेना, State Disaster Response Force, जिल्हाधिकारी (डीसी) आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) यांच्या संयुक्त पथकाकडून बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “गुलमर्ग गोंडोला सेवेत तांत्रिक बिघाड झाल्याने केबल कार सेवा तात्पुरती थांबविण्यात आली आहे. सर्व केबिन सुरक्षित असून प्रशिक्षित पथके अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी काम करत आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.”
हे ही वाचा:
बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीशी संबंधित दहशतवादी निधी प्रकरणात छापेमारी
एआयएडीएमकेच्या तीन आमदारांचा राजीनामा; टीव्हीके पक्षात केला प्रवेश
जागतिक स्तरावर तेलाच्या किमती घसरल्या तरी भारतात इंधन दरवाढ का?
आसाममध्ये समान नागरी कायदा विधेयक सादर, भाजपशासित तिसरे राज्य
घटनेनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांचे महासंचालक नलीन प्रभात गुलमर्गकडे रवाना झाले आहेत. बचावकार्य सुरू असल्याने वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. गुलमर्ग गोंडोला सेवा ही जगातील सर्वात उंच आणि लांब केबल कार प्रणालींपैकी एक मानली जाते. या सेवेत एकूण १०८ केबिन असून प्रत्येक केबिनमध्ये सहा प्रवासी बसू शकतात. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात आणि बर्फाच्छादित पर्वतरांगांचे विहंगम दृश्य अनुभवतात.
