शिवचरित्राचे गाढे अभ्यासक, छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तव इतिहास अस्सल कागदपत्रांच्या सहाय्याने मांडणारे ‘शिवचरित्र’कार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने खासगी रुग्णालयात त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. ते ७८ वर्षांचे होते. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे गुरुवारी सकाळी अकरा वाजता मेहेंदळे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. दुपारी एक वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ इतिहास संशोधन कार्याला वाहून घेतले होते. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि ग. ह. खरे यांची इतिहास संशोधनाची परंपरा त्यांनी वृद्धिंगत केली.
१९ डिसेंबर १९४७ रोजी जन्मलेल्या मेहेंदळे यांना लहानपणापासूनच इतिहासाची आवड होती. १९६९ साली त्यांनी पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळात प्रवेश करून अभ्यासाला सुरुवात केली. याच काळात त्यांना युद्धशास्त्राची आवड निर्माण झाली. वयाच्या २४ व्या वर्षी ‘तरुण भारत’ वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून त्यांना बांगलादेशात पाठवण्यात आले होते, जिथे त्यांनी बांगलादेश मुक्ती वाहिनीच्या क्रांतीकार्याबद्दल अनेक लेख लिहिले आणि प्रत्यक्ष युद्धाच्या काळातही तिथे राहून भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या.
हे ही वाचा:
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ईव्हीएम मतपत्रिकांच्या लेआउटमध्ये केले ‘हे’ बदल
पंतप्रधान मोदींचा वाढदिवस: राज्यातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न!
२६/११ मुंबई, संसद हल्ल्यामागे मसूद अझहरचं; जैशच्या कमांडरची कबुली
सीबीआय न्यायालयाकडून कस्टम निरीक्षकासह दोघांना पाच वर्षांची शिक्षा
पुणे विद्यापीठातून संरक्षण आणि सामरिकशास्त्र विषयात एम.ए. पदवी घेतली. शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्राचा अभ्यास करताना ते शिवचरित्राकडे वळले. यासाठी त्यांनी मोडी लिपीसह फारसी, उर्दू, जर्मन, फ्रेंच, आणि पोर्तुगीज भाषा शिकून घेतल्या. मूळ ऐतिहासिक साधने आणि मुघलांची कागदपत्रे अभ्यासण्यासाठी ते भारतभर फिरले.
त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्लिशमध्ये ग्रंथ लिहिले आहेत, जे आज इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत.
मेहेंदळे सध्या इस्लामची ओळख आणि औरंगजेब या विषयावर संशोधनपर लेखन करत होते. १९७१ च्या युद्धात बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही सीमांवर युद्ध पत्रकार म्हणून स्वतः हजर होते, आणि त्यांचा त्यावरही अभ्यास होता. ते मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर होते. त्यांचा अनेक भाषांसह इतिहासातील लिप्यांचा अभ्यास होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, भारत इतिहास संशोधक मंडळ तसेच विविध संस्थांशी निकटचा संबंध होता. सध्या त्यांचे दुसऱ्या महायुद्धावरच्या पुस्तकाचे काम सुरू होते, ज्याची सुमारे पाच हजार पाने लिहून प्रकाशित होण्यासाठी तयार झालेली आहेत.
या सखोल संशोधनातूनच ‘Shivaji His Life and Times’ (१००० पानांचा इंग्रजी ग्रंथ) आणि ‘श्री राजा शिवछत्रपती’ (२५०० पानांचा मराठी ग्रंथ) हे महत्त्वाचे ग्रंथ साकारले. या ग्रंथांमध्ये त्यांनी सुमारे ७००० संदर्भ दिले आहेत. या व्यतिरिक्त, त्यांनी ‘शिवछत्रपतींचे आरमार’, ‘आदिलशाही फर्माने’, ‘Tipu as he really was’ (इंग्लिश पुस्तिका) यांसारखे ग्रंथही लिहिले. औरंगजेबाच्या धार्मिक धोरणांवर त्यांचा एक ग्रंथ लवकरच प्रकाशित होणार होता.
शिवचरित्र हा विषय १९६९ मध्ये त्यांनी अभ्यासाला घेतला तेव्हापासून अखेरचा श्वास घेईपर्यंत अखंडपणे त्यांचा हा ज्ञानयज्ञ सुरू होता. त्यातून आजवर त्यांनी दोन मराठी व एक इंग्रजी भाषेतील संशोधनपर ग्रंथ सिद्ध केले. त्यांनी मराठीत लिहिलेले शिवचरित्र दोन खंडांत प्रकाशित झाले आहे. ‘शिवछत्रपतींचे आरमार’ हा आणखी एक मराठी ग्रंथ त्यांनी सिद्ध केला. त्यांनी इंग्रजी भाषेतूनही एक शिवचरित्र लिहिले आहे. त्यात शिवपूर्वकाळापासून ते शिवरायांच्या मृत्यूपर्यंत पूर्ण इतिहास आला आहे.







