चीन, जपान आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये अचानक कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर भारतातील सर्व लोकांना याबाबत सतर्क केले जात आहे. कोरोना प्रकरणांमध्ये तीव्र वाढ लक्षात घेता, इंडियन मेडिकल असोसिएशनने सतर्क केले आहे. कोविडच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने केले आहे.
जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत जगात पाच लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हे पाहता कोरोना प्रोटोकॉल पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने सर्वसामान्यांना तसेच केंद्र सरकारला विशेष आवाहन केले आहे. यावेळी केंद्र सरकारला कोरोना येण्याआधीच सर्व तयारी करावी लागणार असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. देशातील परिस्थिती २०२१ सारखी बिघडू नये यासाठी सरकारला सर्व मंत्रालये आणि विभागांना सोबत घेऊन तयारी करावी लागेल, असे संघटनेच्या प्रमुख डॉक्टरांनी सांगितले. ते म्हणाले की, सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, औषधे आणि इतर आवश्यक गोष्टींचा तुटवडा आतापासून दूर करावा लागेल.
हे ही वाचा:
…म्हणून गुजरातमध्ये सर्वाधिक ड्रग्ज सापडले
ठाकरे गटाला धक्का, संजय राऊतांचे जामिनदारच शिंदे गटात
मुंबई मेट्रो लाइन ३ ची गाडी तय्यार!
जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली चिंता
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाशी संबंधित डेटाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी पुन्हा एकदा चीनला कोरोना महामारीचे मूळ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी संबंधित डेटा शेअर करण्यास सांगितले आहे. आम्ही चीनला माहिती शेअर करण्याची विनंती केली आहे. टेड्रोस यांनी कोरोनासारख्या गंभीर आजाराच्या वाढत्या अहवालांसह चीनमधील विकसनशील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.
इंडियन मेडिकल असोसिएशनने केल्या ‘या’ सूचना
- सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालणे.
- लोकांना पुन्हा एकदा सामाजिक अंतर पाळावे
- हात नियमितपणे साबणाने धुवा किंवा स्वच्छ करा.
- राजकीय मेळावा असो किंवा लग्न असो कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम टाळा.
- परदेश प्रवास टाळा.
- ताप, घसा खवखवणे इत्यादी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना भेटा.







