राजधानीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत

अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतुकीसह विमान वाहतूक मंदावली

राजधानीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत

शुक्रवार, २ मे रोजी सकाळी दिल्लीमध्ये अचानक झालेल्या हवामान बदलामुळे जोरदार पावसाने हजेरी लावली. जोरदार वादळासह मुसळधार पावसाने दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतुकीसह विमान वाहतूक मंदावली आहे.

शुक्रवारी सकाळी दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) इतर ठिकाणी जोरदार वादळासह मुसळधार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्लीसाठी यलो अलर्ट जारी केला होता, ज्यामध्ये पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस, गडगडाटी वादळे आणि सोसाट्याचे वारे येण्याचा अंदाज होता. सकाळी IMD ने माहिती दिली की, पुढील दोन तासांत दिल्लीवर तीव्र गडगडाटासह आणि ७०-८० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

पहाटे ५.३० ते ५.५० दरम्यान प्रगती मैदानात सर्वाधिक ७८ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. राजधानीच्या इतर भागातही जोरदार वारे वाहत होते. नजफगडमध्ये ५६ किमी प्रतितास आणि लोधी रोड आणि पितमपुरा येथे ५९ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शुक्रवारी सकाळी ४० हून अधिक विमानांचे उड्डाण वळवण्यात आले आणि जवळपास १०० उड्डाणे उशिराने झाली. दिल्ली विमानतळाने एक्सवर एक सूचना जारी केली, ज्यामध्ये खराब हवामानामुळे काही उड्डाणांवर परिणाम झाल्याची पुष्टी करण्यात आली आणि प्रवाशांना उड्डाण वेळापत्रकांसाठी त्यांच्या संबंधित एअरलाइन्सशी संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला. एअर इंडिया आणि इंडिगो या दोघांनीही या सतर्कतेचे समर्थन केले आणि प्रवाशांना नवीनतम माहिती तपासण्याचे आवाहन केले. एअर इंडियाने असेही नमूद केले की उत्तर भारतातील इतर भागांमध्ये प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे विमान वाहतूक प्रभावित झाली आहे.

दिल्ली-एनसीआरच्या काही भागात गारपीट झाली आहे, ज्यामुळे वादळामुळे निर्माण झालेल्या गोंधळात आणखी भर पडली आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे लाजपत नगर, आरके पुरम आणि द्वारकासह अनेक प्रमुख भागात पाणी साचले, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि सकाळच्या गर्दीच्या वेळी गैरसोय झाली.

हे ही वाचा : 

पाकिस्तानच्या आयएसआयच्या वाढत्या उपस्थितीमुळे बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट!

दोन पत्रकार परिषदा, दोन संकेत…

बीएसएफने दहशतवादी कटकारस्थान उधळलं

फौजिया बेगमने ३० वर्षांनी केले जन्मप्रमाणपत्र, सोमय्यांनी केली पोलखोल

येत्या दोन ते तीन तासांत उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतातील काही भागात वादळी वारे आणि मुसळधार पावसासह जोरदार वादळे येण्याची शक्यता आहे, असे आयएमडीने गुरुवारी रात्री सांगितले. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, उत्तर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नैऋत्य राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, दक्षिण गंगीय पश्चिम बंगाल आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळे, वादळी वारे आणि गारपीट/पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशामध्ये, कंधमाल, कालाहांडी आणि रायगडामध्ये पुढील दोन तासांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे आयएमडीने म्हटले आहे. वाऱ्याचा वेग ताशी ६०-७० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असे आयएमडीने म्हटले आहे.

Exit mobile version