मुंबईत मुसळधार; किनारपट्टीला रेड अलर्ट!

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

मुंबईत मुसळधार; किनारपट्टीला रेड अलर्ट!

राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि घाटमाथ्याच्या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. राज्यातील अनेक भागांत आधीच जोरदार पाऊस सुरू असून नदी-नाले, धरणे आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ४ आणि ५ जुलैदरम्यान मुंबई महानगर प्रदेशात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत अल्पावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास सखल भागांत पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि स्थानिक पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महापालिका, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. किनारपट्टी भागातील नागरिकांनी तसेच मासेमारी करणाऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांत १ ते ७ जुलैदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि किनारपट्टीलगत सक्रिय असलेल्या ऑफ-शोअर ट्रफमुळे राज्यातील पावसाचा जोर वाढला आहे.

हे ही वाचा:

तृणमूलच्या बंडखोर गटाने पक्षाच्या मुख्यालयावर ताबा मिळवल्याचा दावा

३६ वर्षात देशभरातील ३०० हून अधिक आलिशान हॉटेलांना घातला गंडा; ठगाला अटक

अंधेरीतील SRA इमारतीला भीषण आग

सायबर जनजागृती मोहिमेला गैरहजर, २ कोटींच्या फसवणुकीला पडले बळी

पुणे जिल्ह्यातील वरसगाव आणि पानशेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत ६० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत असून, जलसंपदा विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. प्रशासनाने नागरिकांना सखल भाग, पूरग्रस्त रस्ते आणि पाण्याचा वेग असलेल्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. विजांचा कडकडाट होत असताना मोकळ्या जागेत उभे राहू नये, झाडाखाली आश्रय घेऊ नये तसेच आवश्यक असल्यासच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका वाढू शकतो, त्यामुळे पर्यटकांनी विशेष काळजी घ्यावी, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ७ जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, नागरिकांनी अधिकृत हवामान इशारे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version